लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ढोल ताशाचा गजर आणि ‘मोरया’चा जयघोष करीत शुक्रवारी जिल्हाभरात ‘श्रीं’चे हर्षोउल्हासात आगमन झाले. उत्साह आणि ऊर्जेचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, या काळात शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात गणेश मंडळ पदाधिकारी गुंतले होते. स्टेजची उभारणी, गणपती मूर्र्तींची बुकिंग, गणेश मंडळांची नोंदणी, ढोल-ताशा आणि रोषणाई अशी तयारी सुरु होती. गुरुवारी रात्री उशिरा शहरात ठिकठिकाणी स्टेज उभारण्याचे काम प्रगती पथावर होते. शुक्रवारी श्रींची प्रतिष्ठापणा होणार असल्याने सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. बच्चे कंपनीचा उत्साह काही औरच होता.सकाळी ७ वाजेपासून शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार भागात गणेशभक्तांचे आगमन होत होते. या ठिकाणी आकर्षक गणेशमूर्र्तींबरोबरच सजावटीचे साहित्य, पुजेचे साहित्य विक्रीला आले होते. नागरिकांनी क्रांती चौक भागात सहकुटुंब येऊन श्रींची मूर्ती तसेच पुजेचे साहित्य खरेदी केले. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावर्षी गणेशमूर्ती मागील वर्षीच्या तुुलनेत महागल्या आहेत. १०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयापर्यंत मूर्तीची विक्री झाली. शहरामध्ये अनेक शाळा आणि सेवाभावी संस्थांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याने अनेक नागरिकांनी शाडूच्या मातीची मूर्ती बनवून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.शहरामध्ये साधारणत: ५० सार्वजनिक गणेश मंडळांचे नोंदणीसाठी अर्ज आले होते. याशिवाय शहरातील प्रत्येक वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बाल गणेश भक्तांनी सार्वजनिक ठिकाणी गणरायाची स्थापना केली आहे. शुक्रवारी गांधी पार्क भागातील उजव्या बाजुला सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशमूर्तीची दुकाने थाटली होती. या ठिकाणी गणेशमूर्ती खरेदीसाठी मंडळाच्या पदाधिकाºयांनी गर्दी केली होती. बहुतांश पदाधिकाºयांनी गणेश मूर्तींची यापूर्वीच बुकींग केली असल्याने शुक्रवारी या गणेशमूर्ती वाजत-गाजत नेण्यात आल्या.
गणरायाचे जल्लोषात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:21 AM