औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजे राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकाम विस्तारीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आगामी १५ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
विस्तारीकरणाच्या बांधकामासाठी निधीला प्रशासकीय मान्यता मिळून कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. विस्तारीकरणामुळे कर्करोग रुग्णालय २६५ खाटांचे होऊन देशातील अद्ययावत कर्करोग रुग्णालय म्हणून नावारूपाला येईल. विस्तारीकरणात तळमजल्यावर लिनॅक, ब्रेकी थेरपीचे बंकर, बाह्यरुग्ण विभाग, मायनर ओटी, पहिल्या मजल्यावर ४२ खाटांचा वॉर्ड, दुसऱ्या मजल्यावर २ वॉर्ड होतील. सध्याच्या इमारतीवर एक मजल्याचे बांधकाम होईल. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणातील बंकरच्या कामासाठी जमिनीचे लेवलिंग करण्यास सुरुवात झाली आहे, असे रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
२६५ खाटांचे होईल रुग्णालय१५ महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. या विस्तारीकरणामुळे १४५ खाटा वाढतील. त्यामुळे रुग्णालय हे २६५ खाटांचे होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन अखेर कामाला सुरुवात होत आहे, असे टाटा मेमोरिअल हॉस्पिटल्सचे संचालक (शैक्षणिक) व या प्रकल्पाचे सल्लागार डॉ. कैलाश शर्मा यांनी सांगितले.