औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वार परिसराचे २ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, तसेच विद्यापीठ गेटच्या आवारामध्ये शहीद स्मारक उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, विद्यापीठ प्रवेशद्वारापासून काही अंतरावर उभारण्यात आलेल्या सुरक्षा गेटला विरोध झाल्याने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ते काम थांबवून ते गेट पाडले. विद्यापीठ प्रवेशद्वाराशेजारी ‘इन’ आणि ‘आऊट’चा नवीन रस्ता तयार झाला असून, सुशोभीकरण आणि कारंजे आदी कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.
असे असेल नामांतर शहीद स्मारकविद्यापीठ गेटजवळील पाण्याच्या टाकीशेजारी मुख्य रस्त्यावर शहीद स्मारक उभारण्यात येत आहे. गेटजवळ १६०० चाैरस मीटर या परिसरामध्ये भव्य शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे. यात मध्यभागी जमिनीपासून ८ मीटर उंचीचा शहीद स्तंभ उभारण्यात येणार आहे. या स्तंभाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर हा सुशोभित करण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वाराशेजारी १०० चाैरस मीटरचा एक्झिबिशन हॉल, लॉन आदी सुविधा असतील. जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून हा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यासाठी विद्यापीठाने एक कोटीचा निधी २ जानेवारी रोजी वर्ग केला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.