छत्रपती संभाजीनगर : विविध शासकीय कामकाजासाठी चालू तारखेच्या सातबाऱ्याची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने संगणकीकृत केलेला डिजिटल सातबारा यापूर्वीच महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. हा सातबारा आता केंद्र शासनाच्या ‘उमंग’ मोबाइल ॲपवर उपलब्ध होणार आहे. मोबाइल ॲपवर उपलब्ध सातबारा केव्हाही आणि कुठेही डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यात २ लाख ९४ हजार ७६५ सातबारा उतारे संगणकीकृतऔरंगाबाद जिल्ह्यात सुमारे २ लाख ९४ हजार ७६५ सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले आहेत. हे सातबारे आता महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यासोबतच आता उमंग मोबाइल ॲपवर हे उपलब्ध होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. यामुळे सामान्यांचा वेळ वाचेल.
आता ‘उमंग’वरही उपलब्ध होणारमहसूल विभागाच्या रेकॉर्डवरील सर्वच जमीनमालक खातेदारांची सातबारे महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. हे सातबारा उतारे आता केंद्र सरकारच्या उमंग या मोबाइल ॲपवर डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध होतील.
१५ रुपयांत मिळेल स्वाक्षरीयुक्त सातबारासंगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी केलेला सातबारा उतारा घेण्यासाठी सामान्यांना आतापर्यंत महा ई सेवा केंद्र, आपले सरकार अथवा सेतू सुविधा केंद्र येथे जावे लागत होते. आता १५ रुपये शुल्क भरून ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा मोबाइल ॲपवर मिळणार आहे.
आठ अ ही उपलब्धगाव नमुना आठ अ सुद्धा भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांसह, गावापासून दूर राहणाऱ्या जमीनमालकांना होत आहे.
निर्णय स्तुत्यमोबाइल ‘उमंग’ ॲप्लिकेशनवर आता डिजिटल सातबारा उपलब्ध करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल.- जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी.