शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत दोन दिवसांपासून १ वाजेनंतर (दवाखाने आणि औषधी दुकाने वगळता) सर्व बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. पवित्र रमजान महिन्याच्या उपवासामुळे फळे विक्रेत्यांना केवळ सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत विक्री परवानगी देण्यात आली आहे. ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी शहरात ६२ ठिकाणी नाकाबंदी, फिक्स पॉइंट लावले आहेत. प्रत्येक पॉइंटवर एक अधिकारी आणि दहा कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी तैनात आहेत. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी सोमवारी दुपारी शहरात फिरून ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी कशी केली जाते याची पाहणी केली. दुपारी १ वाजता ते छावणी परिसरातील लिटल फ्लॉवर शाळेजवळील फिक्स पॉइंटवर गेले. तेव्हा तेथे १० कर्मचारी त्यांना दिसले नाहीत. काही पॉइंटवर त्यांना एक अधिकारी आणि बारा ते चौदा कर्मचारी तैनात असल्याचे दिसले. ही बाब त्यांना खटकली. याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ठाणेदार हे प्रत्येक चौकात सोयीनुसार कर्मचारी फिक्स पॉइंटच्या कामासाठी लावतात असे त्यांना समजले. तेव्हा ज्या ठाण्याचे निरीक्षक फिक्स पॉइंटवर पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण देतात त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाला संलग्न करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिल्याचे सूत्राने सांगितले.
===कोट
‘ब्रेक द चेन’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. काही पॉइंटवर अपुरे कर्मचारी, तर काही ठिकाणी एक अधिकारी १२ ते १४ कर्मचारी असे चित्र पाहायला मिळाले. काही कारणास्तव ठाण्यात अपुरे कर्मचारी असतील तर मुख्यालयाचे मनुष्यबळ मागवा, अशा सूचना करण्यात आल्या.
= डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त.
------------------------------पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त कारवाईत सहभागी
परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे हे हर्सूल टी-पॉइंट येथे, छावणी विभागाचे सहायक आयुक्त विवेक सराफ, एसीपी सुरेश वानखेडे विविध चौकातील नाकाबंदीत सहभागी झाले.
----------------------------चौकट
सावलीसाठी मंडप आणि पिण्याचे पाणी
उन्हाचा पारा चढत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नाकाबंदीच्या प्रत्येक पॉइंटवर मंडप लावून सावली केली. शिवाय थंडगार पाण्याचे जार उपलब्ध केले. याचा फार मोठा दिलासा नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना मिळाला.