औरंगाबाद : जानेवारीपासून विविध कारणांवरून दंगलीचा सामना करणाऱ्या शहर पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुमारे एक हजार पोलिसांना सहकुटुंब सिनेमा दाखवून सुखद धक्का दिला. शहरातील विविध चित्रपटगृहांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तिकीट बुक करण्यात आले होते.
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर शहरात उसळलेली दंगल, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यानंतर सिडको-हडको आणि गारखेड्यातील तणाव, तसेच कचऱ्याच्या प्रश्नांवरून मिटमिट्यातील दंगल आणि नुकत्याच जुन्या शहरात दोन समुदायांत झालेल्या दंगलीने शहर पोलिसांना साप्ताहिक सुट्यादेखील घेता आल्या नाहीत. व्हीआयपींचा बंदोबस्त, मोर्चे, रॅलीने शहर पोलिसांवरील कामाचा बोज दुप्पटीने वाढला.
अनेक पोलिसांना दंगलीत जखमी व्हावे लागले होते. त्यानंतरही पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह अन्य जखमी अधिकारी, कर्मचारी लगेच कामावर रुजू झाले. धुमसत्या शहरामुळे पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थिती विनातक्रार कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना सहकुटुंब सिनेमाची मेजवानी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुरुवारी दिली.
शहरातील विविध एकेरी पडद्यावरील आणि मल्टीप्लेक्समध्ये गुरुवारी विविध शोमधील सीटस् पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले आणि कर्मचाऱ्यांनी तिकिटांची व्यवस्था सांभाळली.
पोलिसांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न -भारंबेपोलिसांना सिनेमा दाखविण्याच्या संकल्पनेविषयी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, पोलिसांच्या वेलफेअरचा विचार करून आज सिनेमाचे आयोजन केले होते. आज सुमारे एक हजार पोलिसांनी सहकुटुंब सिनेमा पाहिला. अत्यंत स्फूर्तिदायक असा सिनेमा असल्याचे आयुक्त म्हणाले.