औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांची नवीन रचना करण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समितीने वॉर्ड रचनेचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. एक हजार पानांचा हा अहवाल असून, लवकरच आयोग मनपाला आरक्षणाची सोडत घेण्याचा कार्यक्रम देणार आहे. नवीन वॉर्ड रचनेत काही मोजक्याच वॉर्डांची रचना बदलण्यात आली आहे. उर्वरित वॉर्ड जशास तसे ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
एप्रिल २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे. अगोदर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाने प्रभाग पद्धतीची तयारी केली. राज्यात नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत रद्द केली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मनपाचे अधिकारी, कर्मचारी वॉर्ड रचनेचे काम करीत होते. त्यांनी मागील आठवड्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या समितीसमोर नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल सादर केला. समितीने या अहवालाचे बारकाईने निरीक्षण काही फेरबदलाच्या सूचना केल्या. त्यानंतर आज हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. तब्बल एक हजार पानांचा हा अहवाल असून, यामध्ये मोजक्याच वॉर्डांच्या हद्दीत बदल करण्यात आला आहे. सातारा देवळाईत ५ वॉर्ड करण्यात आले आहेत. साताऱ्यातून शहराकडे येणाऱ्या काही वॉर्डांमध्ये बदल केला आहे. शहरातील तीन वॉर्डांचे आपोआप तुकडे झाले आहेत. शंभर टक्के हे वॉर्ड गायब झालेले नाहीत. दुसऱ्या वॉर्डांची हद्द त्यांना जोडण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
खुल्या प्रवर्गातील वॉर्डांवर आरक्षण२०१५ मध्ये खुल्या प्रवर्गात असलेले बहुतांश वॉर्ड यंदा आरक्षणात जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. २२ वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येतील. दोन वॉर्ड एस.टी. प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतील. ११५ वॉर्डांच्या अनुषंगाने ५० टक्के महिला आरक्षणही राहणार आहे. त्यात ओबीसी महिलांचाही समावेश राहील.
दिग्गज मंडळींना मोठा धक्कामनपात मागील १५ ते २० वर्षांपासून सतत निवडून येणाऱ्या काही दिग्गज मंडळींना यंदा धोका निर्माण झाला आहे. त्यांना आपल्या हक्काचे वॉर्ड गमवावे लागणार आहेत. पर्यायी वॉर्डांमध्ये त्यांना निवडणूक लढवावी लागेल. काही दिग्गज मंडळींनी सातारा-देवळाईत जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.