औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या 'नॅक' मूल्यांकनाच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने एका महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तथापि, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले की, या प्रकरणाची तीस दिवसांच्या आत चौकशी करून आपल्यामार्फत हा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत; परंतु या समितीचे अध्यक्ष हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके आहेत. औरंगाबादेत जाऊन चौकशीला केव्हा सुरुवात करायची हा निर्णय तेच घेऊ शकतात. अद्याप तरी याबाबत अध्यक्षांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१७-१८ या वर्षात नॅक मूल्यांकनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. त्या कालावधीत गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी, रस्ते तसेच विविध विभागांत यंत्रसामग्री, दुरुस्ती आदी कामे करण्यात आली.
या कामांसाठी अनेकवेळा मान्यतेपेक्षाही जास्त रकमेची देयके दाखल करण्यात आली. गेल्या मार्चमध्ये तसेच यापूर्वीच्याही अधिसभेच्या बैठकीत सदस्यांनी या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर विधान परिषदेत विविध पक्षांच्या आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याअनुषंगाने सन २०२० च्या दुसऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विधान परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नॅक मूल्यांकनाच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
विधान परिषद सभागृहामध्ये १३ मार्च रोजी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसंबंधी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा विश्वास दिला होता. त्याअनुषंगाने या विद्यापीठातील मूल्यांकनाच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली असून, या समितीने ३० दिवसांच्या आत चौकशी अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. विद्यापीठातील इमारतींना रंगरंगोटी करणे, किरकोळ दुरुस्तींच्या मूळ कामे कोट्यवधी रुपयांनी वाढवली होती. याप्रकरणी विद्यापीठानेही संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी समिती स्थापन केलेली आहे. या समितीचे कामकाजही अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे.
समितीमध्ये कोण आहेत सदस्यचौकशी समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके हे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकुर्णी, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विभागीय आयुक्त कार्यालयातील तपासणी शाखेच्या सहायक आयुक्त वैशाली रसाळ, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र मडके, मुंबई विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड आदींचा समावेश आहे.