- बापू सोळुंके
औरंगाबाद : वर्षभरात शहरात झालेल्या विविध दंगलींमुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये काही काळ अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपूर्वी बदलून आलेले पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरात सुरू केलेल्या कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. याअंतर्गत इंडो-जर्मन टूल रूम आणि सिपेट या संस्थेत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे तरुणांना स्वत:चा उद्योग उभारता येणे अथवा खाजगी कंपनीत नोकरी करण्याची संधी सहज उपलब्ध होत आहे.
१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील घटनेनंतर औरंगाबादेत जोरदार दंगल झाली. या दंगलीनंतर कचऱ्यावरून पुन्हा मिटमिटा, पैठण रोडवरील कांचनवाडी येथेही पोलीस आणि नागरिकांमध्ये धुमश्चक्री झाली. ११ आणि १२ मे रोजी जुन्या शहरात किरकोळ कारणावरून दंगल झाली. ९ आॅगस्ट रोजी मराठा आंदोलनानंतर वाळूज एमआयडीसीत झालेल्या तोडफोड, जाळपोळीच्या घटनानंतर शहराचे मोठे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शेकडो तरुणांविरोधात गुन्हे नोंदवून त्यांना अटकही केली.
पोलिसांवर दगडफेक करणारे बहुतेक तरुणांच्या हाताला काम नाही, ही बाब पोलीस आयुक्तांनी हेरली. डीएमआयसीसह विविध औद्योगिक वसाहती शहरात आहेत. कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे समजले. झोपडपट्टीतील तरुण-तरुणींचे शिक्षण दहावी, बारावीपर्यंतच झालेले असल्याने कंपन्यांकडून नोकरी मिळत नसल्याचे समजले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील सिपेट आणि इंडो-जर्मन टूल रूम या संस्थांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. तेव्हा दहावी, बारावी पास झालेल्या मुला-मुलींसाठी या संस्थांमध्ये विविध कोर्सेस आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना येथे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
या कोर्सेसची माहिती झोपडपट्टीतील तरुणांना माहितीच नसल्याने ते या प्रशिक्षणापासून दूर असल्याचे समजले. जालना येथील धवलक्रांती रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलीस आयुक्तांनी इंदिरानगर झोपडपट्टीत पहिला मेळावा घेतला. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिलाई मशीन वाटपमहिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना पाच महिलांना शिलाई मशीन वाटप केल्या. अन्य महिलांसाठीअगरबत्ती आणि कागदी, तसेच कापडी पिशवी तयार करण्याची यंत्रणा शताब्दीनगरमध्ये बसवून महिलांना रोजगार उपलब्ध केला. याकरिता लागणारा कच्चा मालही माफक दरात मिळवून दिला. एवढेच नव्हे, तर महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विविध कंपन्यांकडून आॅर्डर मिळवून दिल्या.
३८१ तरुणांनी घेतली कोर्सेसची माहितीइंडो जर्मन टुल रूमध्ये जाऊन ३८१ तरुणांनी विविध कोर्सेसची माहिती कालपर्यंत घेतली. यापैकी दोन तुकड्यांतर्गत ६० तरुणांनी प्रवेश घेतला. सिपेटमधील ३० तरुणांची पहिली बॅच प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच बाहेर पडत आहे. शिवाय सिपेटमध्ये प्रवेश घेतलेल्या अन्य ३० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च मनपा प्रशासन करीत आहे. शिवाय बीपीएल कार्डधारक कुटुंबातील मुलांना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. या कोर्सेसला प्रवेश कसा घ्यावा आणि त्याचे महत्त्व डॉ. उढाण, सपोनि. सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश जोशी हे विविध वसाहतींमध्ये जाऊन बेरोजगार तरुणांचे समुपदेशन करीत असतात.
जास्तीत जास्त तरुणांनी हे प्रशिक्षण घ्यावेशहरातील विविध झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या दहावी, बारावी पास झालेल्या तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारच्या सिपेट आणि इंडो-जर्मन टुल रूम या संस्थांमधून विविध प्रकारच्या कोर्सेसला प्रवेश मिळवून दिला जात आहे. एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गातील उमेदवारांना मोफत प्रवेश दिला जातो. बेरोजगारांनी हा प्रवेश घेऊन तांत्रिक कौशल्य आत्मसात केले तर त्यांना स्वत:चा लघु उद्योग सुरू करता येतो अथवा त्यांना खाजगी कंपन्यांत चांगल्या वेतनाची नोकरी मिळू शक ते. जास्तीत जास्त तरुणांनी हे प्रशिक्षण घ्यावे, यासाठी आम्ही झोपडपट्टी भागात मेळावे घेत आहोत. या उपक्रमासाठी मनपा आयुक्त निपुण विनायक, डॉ. कापसे आणि धवल क्रांतीचे डॉ. किशोर उढाण यांचे विशेष साहाय्य मिळत आहे. -चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर