परळी : सनई-चौघड्यांचा मंजूळ सूर, फटाक्यांची अतषबाजी, विजेचा झगमगाट अशा मंगलमय वातावरणात रविवारी येथे हालगे गार्डनमध्ये ५४ मुलामुलींचे सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. नाथ प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात सर्वधर्मीय जोडप्यांनी जन्मोजन्मीच्या रेशीम गाठी बांधल्या.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रूक्मिण मुंडे, माजी आ. पृथ्वीराज साठे, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष बन्सी सिरसाट, डॉ. नरेंद्र काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी सर्व वरांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून हनुमान मंदिरापासून ते मंगल कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी वधु-वरांचे एकत्रित भोजन झाले. त्यानंतर हजारो वऱ्हाडींनी पंगतीत बसून मिष्ठान्न भोजन केले. एक हजाराहून अधिक स्वयंसेवक वऱ्हाडींच्या दिमतीला होते. प्रतिष्ठानच्या वतीने वधूंना मणीमंगळसूत्र, जोडवे, संसारोपयोगी भांड्यांचा सेट भेट दिला.भावाच्या भूमिकेत सदैव पाठिशीयावेळी ना.धनंजय मुंडे म्हणाले, हा सोहळा सामुदायिक असला तरी, ते माझ्या घरचे कार्य आहे, या भगिनींचा विवाह करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. भावाच्या भूमिकेत मी सदैव सोबत राहील, असे ते म्हणाले. नववधू-वरांनी सामाजिक बांधिलकी जपावी, स्त्री भ्रूण हत्या करु नये, आपल्या पत्नीचा सन्मान राखून तिला प्रतिष्ठा द्यावी आणि आनंदाने जीवनभर सांभाळ करावा, असे आवाहन त्यांनी केले. १० वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम सुरू केला होता. आजपर्यंत एक हजार भगिनींचे कन्यादान करण्याचे पुण्य मला मिळाले हिच सर्वात मोठी शिदोरी असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
परळीत ५४ जोडप्यांचे सामुदायिक शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 11:50 PM