उद्योगांचे चाक मंदावले : ‘ब्रेक द चेन’मुळे उत्पादन क्षमता घसरली ६० टक्क्यांपर्यंत
- विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण आहे. सध्या पंधरा दिवसांच्या ‘ब्रेक दि चेन’ या कालावधीत औरंगाबादेतील उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ, कच्चा माल आणि ऑक्सिजनचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता घसरली आहे. निर्यात करणाऱ्या मोठ्या उद्योगांना फारसा परिणाम जाणवत नसला, तरी लघु व मध्यम उद्योगांना ‘ब्रेक दि चेन’चा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पाच औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे सुमारे साडेपाच हजार उद्योग असून, सध्या सरासरी ६० ते ७० टक्के उद्योग सुरू आहेत.
सधारणपणे मार्चपासून उद्योगांना मोठ्या प्रमाणात विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. यंदा दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. ३० ते ३५ परप्रांतीय कामगार गावी निघून गेले आहेत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी कंपनीत येण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे अकुशल कामगार कामांच्या मागणीसाठी रोज येत आहेत; परंतु कंपन्यांना कुशल कामगारांची गरज असल्यामुळे अकुशल कामगारांना ते स्वीकारत नाहीत. सध्या कंपन्यांना कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगांना लागणाऱ्या कच्चा मालाची ३० ते ४० टक्क्यांपर्यंत भाववाढ झाली. या सर्व अडचणींमुळे उद्योगांची गती मंदावली असून, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत.
चौकट....
कच्चा मालाची भाववाढ उद्योगांच्या मुळावर
स्टील, प्लॅस्टिक, पेपर उद्योगांना सध्या कच्चा मालाच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कच्चा मालाचे भाव वाढले आहेत. अगोदर हा माल उद्योगांना उधारीवर मिळत होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अस्थिरता असल्यामुळे आता उधारीवर कच्चा माल दिला जात नाही. या दिवसांत अर्थचक्र थांबल्यामुळे उद्योगांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
चौकट....
औद्योगिक वसाहती - सुरू उद्योग (टक्क्यांत)
वाळूज - ७० टक्के
शेंद्रा- ५५ टक्के
चिकलठाणा - ६० टक्के
रेल्वेस्टेशन - ६० टक्के
चितेगाव - ६० टक्के
उद्योजकांच्या प्रतिक्रिया..................
कुशल मनुष्यबळाची टंचाई
सध्या कुशल मनुष्यबळाची मोठी अडचण असून, शासनाने कंपन्यांकडे असलेले विविध गॅसेसचे टँकर काढून घेतले असून, ते रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरले आहेत. बाजारपेठा बंद असल्यामुळे उत्पादन सुरू ठेवूनही उपयोग होत नाही.
- हर्षवर्धन जैन, उद्योजक
कच्चा मालाचे भाव वधारले
अलीकडे कच्चा मालाच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अर्थसाखळी विस्कळीत झाली आहे. सध्याच्या काळात पहिल्यासारखे कोणी उधारीवर कच्चा माल देत नाही. त्यामुळे अडचणीवर मात करून उद्योग सुरू ठेवावा लागतो.
- शिवप्रसाद जैन, उद्योजक
ऑर्डर आहेत; पण कामगारांची अडचण आहे
कंपन्यांकडे ऑर्डर आहेत; पण कुशल कामगारांची मोठी समस्या आहे. मशीनवर अकुशल कामगारांकडून उत्पादन काढले जाऊ शकत नाही. त्यामुळे अकुशल कामगार कामाच्या मगणीसाठी येतात; परंतु त्यांना कामावर कसे घेणार. त्यांना कामावर जरी घेतले, तरी त्यांच्यामुळे कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असते.
- वसंत वाघमारे, उद्योजक
कामगारांच्या प्रतिक्रिया..................
कामाचे दिवस कमी केले
कंपन्यांमध्ये ५० टक्के कामगारांकडूनच उत्पादन काढण्याचे शासनाचे धोरण असल्यामुळे आम्हाला आठ दिवसाआड कामावर लावले जाते. त्यात कामाची वेळही आठ तासांवरून १२ तास करण्यात आली. यामुळे वेतनही कमी झाले आहे. याशिवाय दर आठ दिवसांला अँटिजेन व पंधरा दिवसांला ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करावी लागते. त्यानंतर निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखविल्यास कंपनीत स्टिकर दिले जाते. ते शर्टवर लावलेल्यांनाच कंपनीत प्रवेश दिला जातो.
- पंजाब पिसे, कामगार
उपासमारीची वेळ आली
अलीकडे कंपन्यांनी कंत्राटदार संस्थांना ५० टक्के कामगार कमी करण्याचे सांगितल्यामुळे आम्हाला १५ दिवस, तर दुसऱ्या कामगारांना १५ दिवस कामावर बोलावले जाते. यामुळे आमचे वेतन कमी झाले असून, कुटुंबाचा गाडा हाकावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीत पॅकिंग किंवा अन्य काम करण्याची तयारी असलेले अनेक नवखे कामगार कामाच्या मागणीसाठी येतात. पण, पूर्वीचेच लेबर कमी केले असल्यामुळे त्यांना काम दिले जात नाही.
- भास्कर मते, कामगार