औरंगाबाद : कॅनडातील कंपनीत अभियंता पदाच्या जागेसाठी आॅनलाईन सर्चिंग करणाऱ्या एका शिक्षकाला ठकबाजाने बनावट करारपत्र पाठवून १९ लाख ६२ हजार ६५५ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकार सुनील सांगवीकर (२७, रा. नाथपुरम, ईटखेडा) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ओमकारचे शिक्षण पदव्युतर भूगर्भशास्त्र विषयात झाले असून, एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे; परंतु परदेशात जाण्याची संधी आॅनलाईन जाहिरात आल्याने त्याने पेजवर लाईक केले आणि बायोडाटा पाठविला. कॅनेडियन कंपनीत अभियंता पदावर निवड झाल्याचा संदेश आल्यामुळे ओमकार खुश झाला. सतत मोबाईल तसेच सोशल मीडियावर संपर्कात राहिल्याने त्यालाही नोकरी मिळाल्याचा आभास निर्माण झाला. आॅनलाईन ठकबजाने त्यास व्हिसा, इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आॅनलाईन बँकेतून मोठ्या रकमा वसूल केल्या. बनावट करारपत्र पाठविले
तुमची नियुक्ती झाली असून, त्या प्रकारचे बनावट करारपत्र पाठवून आॅनलाईन दिले. जुलै २०१८ पासून सुरू असलेल्या घटनेत साडेएकोणीस लाख लुबाडले होते; परंतु विदेशात जाण्याचा योग मात्र येताना दिसत नाही. कागदपत्रांची चाचपणी केली असता अशी कोणतीही कंपनी आढळून आली नाही. ही बाब जेव्हा तपासली तेव्हा ओमकार सांगवीकर यांच्या पायाखालील वाळू सरकली.
फोन बंदने फुटले बिंगओमकार यांनी सोशल मीडिया तसेच फोनवर सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही संदेश नाही आणि फोनचे उत्तर नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजले. एका डॉक्टरलादेखील असेच आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच नोकरीच्या आमिषाने ही दुसरी मोठी फसवणुकीची तक्रार सायबर ठाण्यात दाखल झाली आहे. याविषयी सायबर ठाण्याच्या वतीने तपास सुरू आहे.
आभासी जगात अडकू नकानोकरीच्या आमिषाने महत्त्वाच्या कागदपत्रांची अनोळखी लोकांना फोनवर माहिती देऊ नका किंवा आॅनलाईन कागदपत्रे पाठवू नका. हॅकर व आॅनलाईन ठकबाजांच्या जाळ्यात अडकू नका, असे असल्यास त्यावर तात्काळ पोलीस ठाणे किंवा जाणकाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ठकबाजावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या रकमा फॉरवर्ड करू नये, असे आवाहन सायबर शाखेचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी केले आहे.