लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार या पाहणीमुळे घडला असून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत चार गावांत पथकाने भेटी देत पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण पाहून जालन्याकडे प्रस्थान केले.बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १२२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचा पहिला हप्ता ३२५ कोटी ६० लाख रुपये आला असून, शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.बोंडअळीच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून एकूण ४०७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. बिम्स प्रणालीअंतर्गत ३२५ कोटी ६० लाख रुपये जमा होतील, उर्वरित रक्कम नंतर जमा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपयांचे मदत अनुदान बोंडअळीग्रस्त शेतक-यांना देण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला हप्ता कोषागार कार्यालयाला प्राप्त झाला आहे.शेतकºयांना लागवडीयोग्य पिके, तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती करावी. शेतक-यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिका-यांना केल्या.तालुक्यातील गाढेजळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्य कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, नंदिनी गोकटे, आर.डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीनिवासन, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी गंजेवार, कृषी सेवक, तालुका कृषी अधिका-यांची उपस्थिती होती.पथकाने शेतक-यांशी साधला संवादगाढेजळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून नुकसानीची केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली, तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला, तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशी कापूस पीक लागवड, पीकविमा याबाबत विचारपूस केली.
नुकसानभरपाई खात्यावर; केंद्रीय पथक गेलं शेतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:28 AM