सिल्लोड : सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी शासकीय मदतीचा दुसरा टप्पा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या टप्प्यात मुखपाठ, पानस, मांडणा, पिंपळदरी, सारोळा येथील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. पाच गावांतील ३,४८७ लाभार्थी शेतकऱ्यांना १ कोटी ६९ लाख २८ हजार २७८ रुपये प्राप्त झाले, तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे शेतीमाल व शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने गोळेगाव व अजिंठा मंडळातील नुकसान झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे केले होते. या पंचनाम्यांनुसार १३ गावांतील ३,३५८ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा निष्कर्ष काढला होता. यानुसार ७,८६२ लाभार्थी शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीस पात्र ठरले होते. पंचनाम्यानुसार प्रशासनाने शासनाकडे नुकसानीच्या मदतीची मागणी केली होती. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात बाळापूर गोळेगाव (बु), गोळेगाव (खु) धोत्रा, दिग्रस, लिहा, खेडी, काजीपूर या गावातील ४,३७५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ६९ लाख २८ हजार २७८ रुपये त्या शेतकऱ्यांच्या ऑनलाइनद्वारे खात्यावर टाकले आहेत. ही वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील गावाचे नाव लाभार्थी शेतकरी संख्या
मांडणा (लाभार्थी ६३७) ३१ लाख ८३ हजार ३००, मुकपाठ (३१६) - १८ लाख ७८ हजार २००, पानस - (३२९) १४ लाख ७६ हजार ६००, पिंपळदरी - (९६९) ५० लाख ४२ हजार ३०० रुपये, सारोळा - (१२३६) ३६ लाख ५४ हजार ८००, असे एकूण लाभार्थी शेतकरी ३४८७ असून त्यांना मिळालेले एकूण अनुदान १ कोटी ६९० लाख २८ हजार २७८ असे आहे.