शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद मोदी लाटेवर स्वार होण्याची संधी साधता यावी म्हणून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपात अचानक मोठी स्पर्धा लागली आहे. भाजपाच्या बाहेरून उमेदवार आयात करण्याच्या हालचाली समोर येताच इच्छुकांनी त्याला जोरदार विरोध करण्याची भूमिकाही घेतली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार, विद्यमान आ. सतीश चव्हाण यांच्याशी टक्कर देण्यासाठी आतापर्यंत भाजपाकडून कुणीही समोर येत नव्हते. लोकसभेत भाजपाला दणदणीत यश मिळाले. या मोदी लाटेचा फायदा घेता येईल, या आशेवर उमेदवारांची यादी चक्क १० च्या पुढे सरकली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, विभागीय संघटनमंत्री प्रवीण घुगे, सतीश पत्की, उस्मानाबादचे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, लातूरच्या संघ परिवारातील प्रवीण सरदेशमुख, माजी महापौर विजया रहाटकर आदींचा उमेदवारी मागणार्यांत प्रमुख समावेश आहे. याशिवाय माजी आमदार व अन्य काही कार्यकर्तेही इच्छुक असून त्यांनी आपापले लॉबिंग सुरू केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केल्यामुळे उमेदवार निवडीची लगीनघाई उडाली आहे. भाजपाच्या बहुतांश इच्छुकांनी बुधवारी मुंबई व दिल्ली गाठली होती. भाजपाने उमेदवार निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. त्यांच्या भेटी दिवसभरात या इच्छुकांनी घेतल्या. सचिन मुळेही भेटीला पदवीधर मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. ७६ तालुक्यांत विखुरलेल्या ३ लाख ६५ हजार मतदारांशी संपर्क साधणारा उमेदवार आयात करण्याची तयारी सहा महिन्यांपूर्वी भाजपा पक्षश्रेष्ठींनी दाखविली होती. तेव्हा सचिन मुळे हे नाव समोर आले होते; परंतु मुळे यांनी तेव्हा नकार दिला होता. दरम्यान, सचिन मुळे यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजपातील इच्छुक बिथरले आहेत. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणार्या उमेदवारावर अन्याय होईल, असे पक्षाने वागू नये, अशी मते काहींनी व्यक्त केली. तर सरदेशमुख यांनी सचिन मुळे यांना उमेदवारी देण्याची वेळ निघून गेल्याचे सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांचा विचार व्हावा असे सतीश पत्की यांनी सांगितले. आपही उमेदवार देणार आम आदमी पार्टीचे चिंतन शिबीर दि.२७ ते २९ दरम्यान औरंगाबादेत होत असून, मराठवाडा पदवीधर निवडणूक लढविण्यासाठी चर्चा होऊन उमेदवार द्यावा की देऊ नये, याचा निर्णय होईल, असे आम आदमीचे जिल्हा सरचिटणीस हरमितसिंग यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विधान परिषदेची पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक गांभीर्याने लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी करण्यात आली आहे. औरंगाबादची जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. या जागेवर विद्यमान आ. सतीश चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उमेदवार निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असे आमचे मत आहे. विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
मराठवाडा पदवीधरसाठी भाजपात स्पर्धा
By admin | Published: May 22, 2014 12:51 AM