औरंगाबाद : फसवणूक झालेली रक्कम मला परत मिळवून द्या, असे म्हणत तक्रारदाराने चक्क पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सातारा ठाण्यात घडली. ठाणे अंमलदाराने प्रसंगावधान राखून या तरुणाच्या हातावर हात मारून विषाची बाटली खाली पाडल्याने पुढील अनर्थ टळला. शेख जुबेर शेख अजीज असे या तरुणाचे नाव आहे. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख जुबेर हे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील मध्यस्थामार्फत पिकअप जीप खरेदीचा व्यवहार केला होता. ठरल्यानुसार त्यांनी संबंधितांना पैसे दिले. मात्र, ती जीप काही कारणामुळे तक्रारदारांच्या नावे झाली नाही. जीप नावे होत नाही आणि ते लोक पैसेही परत करीत नसल्यामुळे जुबेर त्रस्त झाले. त्यांनी काही दिवसांपूर्वी सातारा ठाण्यात यासंदर्भात तक्रार अर्ज दिला होता. संबंधितांकडून आपल्याला पैसे परत मिळवून द्या, अशी मागणी करीत ते ठाण्याच्या चकरा मारत होते. बुधवारी दुपारी जुबेर विषाची बाटली खिशात घेऊन थेट सातारा ठाण्यात गेले. तेव्हा तेथे ठाणे अंमलदार सुभाष मानकर आणि अन्य अधिकारी, कर्मचारी बसलेले होते. जुबेर त्यांना म्हणाले की, मला खूप टेन्शन आले आहे. माझ्यावर कर्ज झाले आहे. मी आता विष पिऊन आत्महत्या करतो, असे म्हणून खिशातून छोटी प्लास्टिकची बाटली काढून तिचे झाकण काढून तोंडाला लावली. पोलीस हवालदार मानकर यांनी त्यांच्या हातावर हात मारून बाटली खाली पाडली. ठाणे अंमलदार कक्षात विष सांडले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने जुबेर यांना रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदविला.
तक्रारदाराचा पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:04 AM