औरंगाबाद : घाटीतील रुग्ण खाजगी रुग्णालयांत पळविण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे पार्किंग करून रुग्णसेवेत अडथळा आणणाºया ९ रुग्णवाहिकांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रविवारी रात्री घाटीत पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी ९ रुग्णवाहिका अनधिकृपणे उभ्या केल्याचे आढळून आले. या रुग्णवाहिके च्या चालकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्यास संबंधित चालक जुमानत नव्हते.
अपघात विभाग, मेडिसिन विभागासह परिसरातील रस्त्यांवर रुग्णवाहिका उभ्या करून चालक निघून जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या रुग्णवाहिकांवर कारवाई करावी, असे घाटी रुग्णालय प्रशासनाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
रुग्णवाहिकांनी पार्किंगच्या जागेतच उभे राहणे आवश्यक आहे; परंतु घाटीतील सेवा चांगली नाही, डॉक्टर नाहीत, औषधी नाहीत, अशी कारणे सांगून रुग्णांना खाजगी रुग्णालयात नेण्याचा प्रकार होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.