लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शुभकल्याण मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या येथील शाखेत दोनशेवर खातेदारांचे सुमारे दीड कोटी रूपये अडकले आहेत. वारंवार चकरा मारूनदेखील मुदतठेवींचे पैसे मिळत नसल्याने खातेदारांमधून संताप व्यक्त होत आहे. गुरूवारी आष्टीच्या व्यापाºयांनी आष्टी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.दामदुपटीच्या अमिषावर खातेदारांनी ठेवी जमा केल्या. ठेवीची मुदत संपल्यानंतर पैशांची मागणी करताच ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. उस्मानाबाद येथील मुख्य शाखेतही ठिय्या मांडला होता. ३० जुनपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असे सांगून खातेदारांची बोळवण करण्यात आली. अखेर आष्टीतील गोरक्षनाथ धोंडे, सुनिल देशपांडे, सुमतीलाल मेहेर, दिलीप जानापुरे, महावीर वर्धमाने, सय्यद युसूफ इकबाल, संदिप सानप, सुधीर विडेकर, प्रविण धस आदी ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेत शुभकल्याणविरोधात तक्रार दिली.आष्टी शाखेचे शाखाधिकारी वैभव देशमुख म्हणाले, आम्ही वारंवार हेड आॅफिसशी संपर्क करत असून तारखेवर तारीख देण्यात येत आहे. आता वरिष्ठांनी फोनच बंद केला आहे. आष्टीचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले, तक्रार दाखल झाली आहे. चौकशी करून व ठेवीदारांचे जवाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येईल.
‘शुभकल्याण’ विरोधात आष्टी पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:58 AM