औरंगाबाद: महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, शहरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शहर काँग्रेस, रिपब्लिकन सेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली.
शहरातील वेदांत नगर पोलीस स्टेशनला चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, पाटलांविरोधात तीव्र आंदोलनही करण्यात आले. यावेळी विजय वाहुळ, मुकेश खोतकर, नरेश वरठे, विशाल हिवराळे, भीमसेन पट्टेकर, शुभम हिवराळे, मनीष नरवडे, सचिन भुईगळ, राहुल साळवे, अमोल ननावरे, अमित वाहुळ व भीम सैनिक उपस्थित होते
दरम्यान, शहरात सायंकाळी साडे सहाच्या सुमारास काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते जमले. यात महिलांचाही सहभाग होता. औरंगपुरा येथील स.भु महाविद्यालयाजवळ अचानक एकत्र येऊन हे कार्यकर्ते ‘ महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, माफी मांगो, चंद्रकांत पाटील माफी मागो’अशा घोषणा देऊ लागले. तिकडे आत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू होता. महापुरुषांबद्दल अपशब्द का वापरले असा जाब कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याना विचारायचा होता.
महाविद्यालय परिसरात निषेध पत्रके उधळलीदरम्यान, स.भु महाविद्यालयाजवळ मंत्री पाटील यांच्या निषेधाचे पत्रक उधळून सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, राहुल वडमारे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप संबंधितांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचे हे षड्यंत्र आहे. या सर्वांची नार्कोटेस्ट करून तुरुंगात टाकावे. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले.