औरंगाबाद:भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दि.०२ मे रोजी विविध वृत्तवाहिन्यांवर ओबीसी समाजाचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना चूप बसा, जास्त बोललात तर महागात पडेल अशी जाहीर धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज अ.भा.समता परिषदेच्या औरंगाबाद जिल्हा शाखेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची भेट घेऊन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी तक्रार अर्ज दाखल केला.
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल मधील विजयावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी ही धमकी दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध जाहिररित्या धमकावणे, सत्तेच्या जोरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे व ओबीसी व माळी समाजाच्या भावना दुखावणे याबद्दल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, चंद्रकांत पेहरकर, संदीप घोडके, योगेश हेकाडे, नागेश हिवाळे आदींनी हा तक्रार अर्ज सादर केला. पोलिस उपनिरीक्षक संदीप बागूल यांनी निवेदन स्वीकारले व याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
काय आहे प्रकरण छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया दिली होती. यात भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. "बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाली आहे", असा टोला भुजबळ यांनी लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना थेट इशाराच दिला आहे. "छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले.