औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पदवी परीक्षांचा निकाल जाहीर केला. घोषित झालेल्या निकालातील त्रुटी, तक्रारींची माहिती एकत्रितपणे पुढील १० दिवसांत ई मेलद्वारे नेमून दिलेल्या कक्षाला कळवा. विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका. विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी काढले आहे.
उर्वरित इतर पदवी व पदव्युत्तर पदवी निकाल घोषित करण्याची प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून सुरू आहे. टप्प्या टप्प्याने उर्वरित निकाल जाहीर होतील. निकाल विद्यार्थ्यांनी आधी समजून घ्यावा. चाॅईस बेस ग्रेडींग सिस्टीम विद्यार्थ्यांना समजलेली दिसत नाही. त्यामुळे निकालात विद्यार्थ्यांना त्रुटी वाटत असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा. महाविद्यालयांना त्रुटी, तक्रारी, राखीव निकालांची माहिती दिलेल्या नमुन्यात ९ विविध कक्षांच्या इमेलवर पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तक्रारींसाठी येऊ नये. त्यांनी महाविद्यालयात, संबंधित विभागात आपले म्हणणे कळवावे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी, त्रुटी, अडचणींचे निरसन करून ते संबंधित महाविद्यालयाला कळवण्यात येईल. सर्व विभागप्रमुख, शैक्षणिक विभाग, विद्यापीठ परिसर व उपपरिसर तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांना देण्यात परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत, असे डाॅ. मंझा म्हणाले.