छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिक पोलिस ठाण्याची झंझट नको म्हणून कायम दोन हात लांबच असतात. पाेलिस ठाण्यामध्ये पहिल्यांदाच गेल्यावर आपली तक्रार ऐकली जाईल का?, कशी वागणूक मिळेल? अशा नानाविध प्रश्नांनी त्यांना भीती वाटत असते. मात्र, नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार तुम्ही कोठूनही तुमची तक्रार पोलिसांपर्यंत नोंदवू शकता, पोहोचवू शकता.
पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे अनेक जण तेथे जाणे टाळतात. बऱ्याचदा प्रत्यक्ष पोलिस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयात जाणेही तक्रारदारांना शक्य होत नाही. त्यामुळे सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांना याची दखल घेणे बंधनकारक असून चौकशीनंतर त्यावर आवश्यक कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. तुम्ही राहत असलेल्या किंवा तुमच्यासोबत घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तुम्ही कुठल्याही ठाण्यात, आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल करू शकता.
काय आहे ई-आफआयआर?क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस)च्या माध्यमातून ही तक्रार नोंदवला येते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अंतर्गत ही प्रक्रिया पार पाडली जाते. नव्या बीएनएस कायद्यानंतर या सीसीटीएनएसमध्ये नव्याने बदल करण्यात आले. त्याद्वारे पोलिस ठाण्यात न जाता ऑनलाइन ई-एफआयआर नोंदवता येऊ शकतो.
तक्रार कशी नोंदवाल?-ऑनलाइन तक्रारीसाठी पोलिसांच्या सिटिझन पोर्टलवर अकाउंट तयार करावे लागते. लॉगइन आयडी, पासवर्डद्वारे अकाऊंट तयार केल्यावर परिपूर्ण व सत्य माहिती भरणे आवश्यक आहे. यामुळे वेळेची देखील बचत होते.
पोलिस खात्री करून घेणारऑनलाइन तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस त्यातील माहितीची खात्री करतील. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला संपर्क केल्यावर तुम्हाला ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.
चौकशीसाठी हजर राहावे लागतेसिटीझन पोर्टलद्वारे कोणताही नागरिक कोठूनही पोलिसांकडे तक्रार करू शकतो. त्याची नक्कीच दखल घेतली जाते. गुन्ह्याच्या पुढील प्रक्रियेसाठी मात्र त्याला सदर पोलिस ठाण्यात हजर राहणेही गरजेचे आहे. पोर्टलवर तक्रार करताना माहिती मात्र अचूक असावी.- नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १