औरंगाबाद : ग्रामीण आणि शहरातील झोपडपट्टी भागात कुपोषित मुले जशी नजरेस पडतात तशीच अनेक वसाहतीत अतिपोषण झाल्यामुळे स्थूल झालेली मुले, मुली पहायला मिळतात. स्थूलता असलेल्या लहान मुलांमध्ये चिडचिडपणा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याकडे कल दिसतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याची वेळ निश्चित करावी, त्यांच्याकडून व्यायाम करून घ्यावा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ यांनी दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या बाराशेहून अधिक असल्याचे समोर आले. ग्रामीण भागात जसे कुपोषित बालक आढळून येतात, तशी ती शहरातही असतात. कुपोषित बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत सकस आहार पुरविला जातो. त्यांची वजन आणि उंचीचे मोजमाप घेतले जाते. त्यांना अतिकुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करते. कुपोषण समस्येसारखेच अतिपोषणामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा आजार पाहायला मिळताे. दीड ते पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. घरीच असलेल्या मुलांना आता कुठे खेळायला मैदाने खुली करण्यात आली. या कालावधीत मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन क्लास संपल्यानंतर दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असत. फास्ट फूड खाणे, रात्री उशिरा झोपणे आदी सवयी बालकांना लागल्या. याचे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले. अनियंत्रित खाणेपिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला. लठ्ठ झालेल्या मुलांमध्ये चिडचिडपणा, अभ्यासाचा कंटाळा आदी लक्षणे दिसतात.
कोट...
कोविड संसर्ग सुरू झाल्यापासून लहान मुलेमुली घरातच आहेत. त्यामुळे मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा. सूर्यनमस्कार, प्राणायाम अथवा खेळण्यासाठी त्यांना घराबाहेर मैदानावर न्यावे.
- डॉ. रेणुका बोराळकर, बालरोगतज्ज्ञ
--------------------
लहान मुलांमधील स्थूलपणा कमी करणे आवश्यक असते. याकरिता पालकांनी पुढाकार घेऊन मुले, मुली सकाळी ६ वाजता झोपेतून उठतील आणि रात्री ९ वाजता झोपतील, याची काळजी घ्यावी. शिवाय तेलकट पदार्थ जास्त खाण्यास देऊ नयेत. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि अन्य मैदानी खेळ खेळायला घेऊन जावे.
- नागेश पाटील, वैद्य