नियमित फेड करणाऱ्यांचा कर्जमाफीत समावेश करा
औरंगाबाद : सिल्लोड येथील शेतकरी अशोक चाटे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात येऊन शासनामार्फत देण्यात येणारे बियाणे पेरणीपूर्व देण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली. कपाशी आणि मका बियाणांचा समावेश असावा, अशीही मागणी त्यांनी केली. गंगापूर येथील शेतकरी सुभाष कानडे यांनी टरबूज, खरबूज या फळ पिकांचा पीक विमा योजनेत समावेश करावा, तसेच युरिया खताच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत मागणी केली.
भित्तीपत्रिका, घडी पत्रिकेचे प्रकाशन
औरंगाबाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या खताचा कार्यक्षम वापर व खत बचत याबाबत घडीपत्रिका व भित्तीपत्रिका यांचे प्रकाशन खरीप आढावा बैठकीदरम्यान कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीनंतर शेतकऱ्यांना बांधावर खत पुरवठा करणाऱ्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाची सुरुवात कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.