लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील बहुचर्चित तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी समितीने सोमवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. कोट्यवधींच्या घरात असणाऱ्या या घोटाळ्यात सुमारे साडेतीनशे व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून जालना, परतूर, तीर्थपुरी व अंबड येथील बाजार समित्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याचे समोर आले. विशेषत: जालना नाफेड केंद्रावर परराज्यातील तूर विकल्याची चर्चा होती. त्यामुळे सुमारे दोन लाख क्विंटल तूर खरेदी घोटाळ्याचा तपास करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले. गुन्हे शाखेने आठ हजार चारशे शेतकऱ्यांची यादी तयार करून तपास सुरू केला. मात्र, तूर खरेदीच्या बहुतांश बाबी पणन विभाग व खरेदीविक्री संघाशी निगडित असल्याने चौकशीकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, पणन अधिकारी, खरेदी विक्री संघाचे अधिकारी अशा सात जणांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने नाफेड केंद्रावर तूर विकणाऱ्या अकरा हजार शेतकऱ्यांमधून संशयास्पद वाटणाऱ्या साडेसात हजार शेतकऱ्यांची यादी तयार केली. यात २५, ३० व ४० क्विंटलपर्यंत तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांचे तीन वेगवेगळ गट तयार करून तपास सुरू करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री झाली, त्याच्या खात्यात नाफेडकडून जमा झालेले पैसे बँकेतून कोणत्या व्यक्तीच्या नावावर वळते झाले, यासंबंधीचे दस्तावेजही चौकशीत तपासण्यात आले आहेत. यातील हजारांवर व्यवहार संशयास्पद असून, परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी जालन्यात शेतकऱ्यांच्या नावे तूर विकल्याचे समोर आले आहे. तूर खरेदी-विक्रीचा हा घोटाळा पंधरा कोटींच्या घरात आहे. चौकशी समितीने दहा पानांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना सादर केला आहे. दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी अखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:07 AM