वाळूज महानगर : केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला वाळूज महानगरात मंगळवारी (दि. ८) संमिश्र प्रतिसाद मिळाला. सीटूप्रणीत युनियन असलेल्या बहुतांशी कारखानदारांनी सुटी दिल्याने बंद शांततेत पार पडला.
केंद्र व राज्यातील भाजप सरकार कारखानदारांचे हित जोपासण्यासाठी कामगारविरोधी धोरण राबवीत असून, मूळ कामगार कायद्यात बदल करीत आहे. कामगारविरोधी कायद्यातील प्रस्तावित बदलाच्या विरोधात कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी वाळूज औद्योगिक क्षेत्रात विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामगार चौकातील कामगाराच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वाहन रॅलीद्वारे बंदचे आवाहन केले. त्यानंतर ही रॅली पंढरपूर तिरंगा चौक मार्गे शहरातील क्रांतीचौकात दाखल झाली. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, असे म्हणत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ज्या कारखान्यात सीटूप्रणीत समविचारी कामगार संघटनेच्या युनियन असलेल्या कारखानदारांनी मंगळवारी सुटी जाहीर करून रविवारी काम करून घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे मेडिकल, केमिकल, बीअर कंपन्या वगळता बहुतांशी कारखाने बंद होते. कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा बंद शांततेत पार पडला. या बंदमध्ये सेंटर ट्रेड आॅफ युनियन (सीटू), मराठवाडा कामगार विकास संघटना, न्यू पँथर कामगार सेना, औरंगाबाद मजदूर युनियन, ईएसआय कामगारधारक संघटना आदींनी सहभाग घेतला. शिवसेना-भाजप पुरस्कृत कामगार संघटना मात्र या संपात सहभागी झाल्या नव्हत्या.
यावेळी ईएसआय कामगार संघटनेचे प्रकाश जाधव, न्यू पँथर कामगार सेनेचे अनिल जाभाडे, सीटूूचे काँ. उद्धव भवलकर, लक्ष्मण साक्रुडकर, नितीन देशमुख, दामोदर मानकापे, महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे रामकिसन शेळके, गणेश घोरपडे, संतोष दळवी, दत्तू भंडे, अशोक श्रीखंडे, राजू डोईफोडे, नथू पतंगे आदींसह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.