- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : रुग्णांना गरजेनुसार किंवा रुग्ण मागेल तेवढीच औषधी देण्याऐवजी शहरातील औषधी दुकानांवर गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप त्यांच्या माथी मारली जात आहे. हा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आला.
औषधी आणि सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मधील ६५(९) या तरतुदीनुसार, रुग्णाला औषध दुकानातून वितरित करायच्या औषधांबाबत स्पष्टपणे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्णाने एक, दोन अथवा आर्थिक कुवतीप्रमाणे गोळ्या मागितल्या, तर त्याला १० किंवा १५ गोळ्यांची संपूर्ण स्ट्रिप देण्याची आवश्यकता नाही, असा त्याचा सरळ अर्थ असतानाही औषध दुकानदारांकडून तो नियम पाळला जात नाही.
औषधांच्या भरमसाठ किमती असल्यामुळे एक ते दोन दिवसांची आवश्यक तेवढीच औषधी घेऊन उर्वरित नंतर घेण्याचा विचार सर्वसामान्य नागरिक करतात; परंतु स्ट्रिप कापून गोळ्या देता येत नाहीत. तुम्हाला १० गोळ्यांची स्ट्रिप घ्यावी लागेल, असे औषध विके्रत्यांंकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नाइलाजाने पैशांची जुळवाजुळव करून औषध विक्रेत्यांकडून गोळ्यांची अख्खी स्ट्रिप घ्यावी लागत आहे. परिणामी, आर्थिक अडचणींना तोंड देण्याची वेळ गोरगरिबांवर ओढावत आहे.
ग्राहक, रुग्ण मागेल तेवढ्या गोळ्या स्ट्रिपमधून कापून देता येतात. अनेकदा रुग्णांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने आपल्या खिशाचा अंदाज घेऊनच ते औषधे खरेदी करतात. जी मेडिकल दुकाने देत नाहीत, त्यांना सूचना केल्या जातील, असे औरंगाबाद केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
औषधींसाठी स्ट्रिप घेण्याच्या सक्तीविषयी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. तेव्हा सर्वसामान्यांना अनेक औषधी दुकानांवर आर्थिक भुर्दंड सहन करून औषधी घ्यावी लागत असल्याचे सत्य उघड झाले. घाटी रुग्णालय, घाटी परिसर, डॉ. हेडगेवार रुग्णालय परिसरासह विविध भागांतील औषधी दुकानांवर पाहणी करण्यात आली. औषधी दुकानदारांनी स्ट्रिप कापून गोळ्या देण्यास नकार दिला. त्यानुसार काही गोळ्यांची खरेदीदेखील करण्यात आली.
स्ट्रिपनुसार गोळ्या लिहिण्याचा प्रकारअनेक डॉक्टर स्ट्रिपनुसार गोळ्या लिहितात, असे स्टिंग आॅपरेशनमध्ये औषधी दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे औषधी कंपन्या आणि डॉक्टरांमध्ये साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त होतो; परंतु ‘आयएमए’ने यास नकार दिला. औषधांच्या कोर्सनुसार गोळ्या लिहून दिल्या जातात, असे सांगण्यात आले.
औषधी प्रशासनाचे हात वरपैसे नसतील तर औषधी उधार घेतली पाहिजे. आज अर्ध्या, उद्या उर्वरित घेणे, हे असे करता येत नाही. डॉक्टरांनी चिठ्ठीत दहा गोळ्या लिहिल्या, तर दहाच घेतल्या पाहिजेत. पाच लिहिल्या, तर पाचच घेतल्या पाहिजेत. आज अर्ध्या गोळ्या घेतल्यानंतर उर्वरित गोळ्या उद्या कोणी घेईल, याची गॅरंटी नसते. त्यामुळे डॉक्टरांनी जेवढ्या लिहून दिल्या तेवढ्या घेतल्याच पाहिजेत, असे म्हणत औषधी प्रशासनाने गोरगरीब रुग्णांसंदर्भात हात वर केले आहेत.
केस-१ : जीवनधारा मेडिकल स्टोअर्स, घाटी रुग्णालयप्रतिनिधी : या गोळ्या पाहिजेत.मेडिकल : कंपनी बदलून मिळेल.प्रतिनिधी : एकाच दिवसाच्या द्या मग.मेडिकल : एक दिवसाच्या गोळ्या देता येणार नाहीत. स्ट्रिप कापता येत नाही. दहा घ्याव्या लागतील.
केस-२ : न्यू हर्ष मेडिकल, घाटी रोडप्रतिनिधी : या गोळ्या द्या.मेडिकल : ७० रुपयांच्या १० आहेत. प्रतिनिधी : एका दिवसाच्या द्या मग.मेडिकल : गोळ्या सुट्या देता येत नाहीत. पूर्ण स्ट्रिप घ्यावी लागेल. प्रतिनिधी : स्ट्रिप घ्यावीच लागेल का?मेडिकल : उरलेल्या गोळ्या विकल्या जात नाहीत.
केस-३ : बालाजी मेडिकल, त्रिमूर्ती चौक रोडप्रतिनिधी : गोळ्या पाहिजेत.मेडिकल : एक स्ट्रिप देतो, सहा गोळ्या देता येणार नाहीत.प्रतिनिधी : एक स्ट्रिप नको.मेडिकल : गोळ्या कापता येत नाहीत. स्ट्रिप घ्यावी लागेल.प्रतिनिधी : कापून देता येत नाहीत का?मेडिकल : डॉक्टरच १० लिहून देतात. म्हणजे एक स्ट्रिप निघून जाते.