वाळूज महानगर : दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर महावितरणकडून सक्तीचे भारनियमन केले जात असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
वाळूज महानगर परिसरात महावितरणकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने भारनियमन केले जात आहे. येथील सिडको, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, रांजणगाव आदी परिसरात ट्रान्सफार्मर जळणे, विद्युत तारा तुटणे, फ्युज उडणे, केवबल वायर जळणे आदी कारणांमुळे तासंतास वीजपुरवठा खंडित होत आहे. नवीन आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याला परिसराची माहिती नसल्याने खंडित वीजपुरवठा लवकर सुरु करणे अवघड जात आहे. शिवाय दर शुक्रवारी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून ७ ते ८ तास सक्तीचे भारनियिमन केले जाते.
महावितरणच्या या सक्तीच्या भारनियमनामुळे डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा व्यवसायावरही परिणाम होत आहे. दिवाळीच्या सण जवळ आल्याने व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करुन दुकाने थाटली आहेत. दिवसा कामाला जावे लागत असल्याने बहुतांशी नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. पण लाईट नसल्याने दुकानदाराला इन्व्हर्टर, बॅटरीचा आधार घ्यावा लागत आहे.
अंधारामुळे ग्राहक खरेदी करण्यास सहसा धजावत नाहीत. खरेदीसाठी बाजारपेठेत येऊनही दुकानातील अंधार पाहून नागरिकांना रिकाम्या हातानी घरी परतावे लागत आहे. याचा व्यवसायिकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. भारनियमनामुळे व्यापाºयांना व्यवसाय करणे अवघड होत आहे.
महावितरणने किमान सणासुदीच्या काळात तरी विजपुरवठा खंडित करु नये, असे व्यापारी महावीर धुमाळे यांनी केली आहे. या विषयी महावितरणचे अभियंता उकंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.