औरंगाबाद : महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त बुधवारी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत ‘जिओ और जिने दो’ या भगवान महावीरांच्या संदेशावर आधारित चित्ररथ, देखावे तयार करण्यात येत आहेत. तसेच महोत्सवादरम्यान याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
सकल जैन समाज अंतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी पत्रपरिषद घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष मुकेश साहुजी म्हणाले की, भगवान महावीर यांनी दिलेला ‘जिओ और जिने दो’चा संदेशच संपूर्ण जगाला तारू शकतो. यंदा महोत्सवात याच संकल्पनेवर आधारित लहान-मोठे ३०० उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. दुष्काळ लक्षात घेता ग्रामीण भागात ७२ दिवस दोन टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत आहे. तसेच जनावरांना चारा वाटपही करण्यात येत आहे. घाटीसह विविध भागांत अन्नदान केले जात आहे.
कार्याध्यक्ष अनिल संचेती म्हणाले की, यंदा १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता महावीर उड्डाणपूल खालील भगवान महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७.१५ वाजता उत्तमचंद जैन छात्रालय तसेच गुरुगणेशनगर येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता पैठणगेट येथून मुख्य शोभायात्रेला सुरुवात होईल. यात शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर, सिडको, गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर जोहरीवाडा, विमलनाथ जैन मंदिर जाधवमंडी यांचे रथ तर राजाबाजार जैन मंदिर, सराफा व हडको येथील जैन मंदिर, सैतवाल जैन मंदिर येथील पालखी शोभायात्रेत सहभागी होणार आहे.
१६ चित्ररथांतील देखावे व ढोलपथक आकर्षण ठरणार आहेत. टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंज, राजाबाजार हा शोभायात्रेचा मार्ग राहणार आहे. महावीर मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान महारक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. समाजबांधवांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
जन्मोत्सव समितीचे करुणा साहुजी, नीलेश सावलकर, भावना सेठिया, राजेश मुथा, मंगल पारख, नीलेश पहाडे, मंजू पाटणी, स्वप्नील पारख, कविता अजमेरा, पुष्पा बाफना यांच्यासह सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष, पदाधिकारी, महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष उपस्थित होते.
शोभायात्रेत सहभागी होणार साधू-संतजैनाचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव, आचार्य हेमसागरजी महाराज, विवेकमुनीजी म. सा. ठाणा-४, लोकेशमुनी म. सा., प्रणवमुनीजी म. सा., प्रतिभा म. सा., साध्वी प्रतिभाजी म. सा., सुशीलाजी म. सा., किरणसुधाजी म.सा., प्रफुल्लाजी म.सा. आदिठाणा २७, अर्केदुश्रीजी म.सा., साध्वीजी राकेशकुमारजी आदिठाणा-४, उज्ज्वलप्रभाजी आदिठाणा ४, सुयशाश्रीजी म.सा. आदिठाणा ५, आर्यिका कुलभूषणमाताजी, आर्यिका क्षमाश्री माताजी आदी साधू-संत भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.