औरंगाबाद : शहरामध्ये १९८८ साली केवळ दोन लायन्स क्लब अस्तित्वात होते. त्यानंतर क्लबची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या लायन्सची संकल्पना येणाऱ्या पिढ्यांना ऊर्जा देणारी असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ तथा लायन्स परिवाराचे प्रमुख राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी येथे केले.
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या अंतर्गत शहरातील १८ क्लबच्या नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष यांच्यासाठी विभागीय वैचारिक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू, बहुप्रांतीय अध्यक्ष विवेक अभ्यंकर, विभागीय अध्यक्ष राजेश भारुका, आशिष अग्रवाल, संदीप मालू, पूर्व प्रांतपाल राजेश राऊत, महावीर पाटणी, तनसुख झांबड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र दर्डा म्हणाले, ३४ वर्षांपूर्वी शहरात फक्त दोन लायन्स क्लब अस्तित्वात होते. त्यातील चिकलठाणा क्लबचा मीच अध्यक्ष होतो. मुख्य क्लबचे अध्यक्ष दिवंगत हजारी होते. आम्ही संयुक्तपणे लायन्स परिवाराची स्थापना ‘लोकमत’च्या प्रांगणात केली. त्यावर्षी अरविंद माछर हे उपप्रांतपाल म्हणून निवडून आले. त्यानंतर आतापर्यंत या परिवाराने ८ प्रांतपाल सेवेसाठी दिले. दोन बहुप्रांतीय अध्यक्ष आणि डॉ. नवल मालू यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय संचालक या परिवाराने दिला. हे परिवाराच्या नेतृत्व क्षमतेचे प्रमाण आहे. आजच्या स्थितीला शहरात लायन्स इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सहकार्याने लायन्स आय हॉस्पिटल, लायन्स डायलिसिस सेंटर, लायन्स बालसदन, लायन्स ब्लड बँक, लायन्स डायग्नोस्टिक सेंटर, घाटी येथील लायन्स पॅथॉलॉजी लॅब आदींसाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. लायन्स डायबेटिस सेंटरसाठी ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे सर्व केवळ आणि केवळ लायन्स परिवाराच्या समता, ममता आणि एकतेमुळेच शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. नवल मालू यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७-सी च्या माध्यमातून सेवा, सदाचारासह प्रशासकीय कार्याची माहिती दिली. संदीप मालू यांनी ‘क्लब एक्सलन्स’ पुरस्काराबद्दल माहिती दिली. राजेश राऊत यांनी क्लब सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याबाबत मार्गदर्शन केले. महावीर पाटणी यांनी लायन्स परिवाराची प्रतिज्ञा सर्व उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल लदनिया यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयदीप घुगे, राधा तोरणेकर, जयराज पाटील, संजय कासलीवाल, किशोर लालवाणी आदींनी प्रयत्न केले.
फोटो ओळ : लायन्स क्लबच्या विभागीय वैचारिक कार्यशाळेचे उद्घाटन करताना ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ तथा लायन्स परिवाराचे प्रमुख राजेंद्र दर्डा. यावेळी (डावीकडून) विशाल लदनिया, आशिष अग्रवाल, राजेश भारुका, विवेक अभ्यंकर, डाॅ. नवल मालू, संदीप मालू, महावीर पाटणी, तनसुख झांबड.