लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी फक्त ९० दिवसांचा अवधी शेतक-यांनी दिला आहे. महापालिकेने या ९० दिवसांमध्ये कच-यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करावी, अन्यथा कचरा दुसरीकडे नेऊन टाकावा, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा प्रशासनाकडून पर्यायी जागेचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पर्यायी जागा काही केल्या मिळेना. जिल्हा प्रशासनाही जागा उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही.मागील ३० वर्षांपासून महापालिका नारेगाव येथे कचरा टाकत आहे. कचरा डेपो दुसरीकडे न्यावा या मागणीसाठी नागरिकांनी आतापर्यंत पन्नास वेळेस आंदोलने केली आहेत.पंधरा दिवसांपूर्वीच केलेल्या आंदोलनात शेतकरी, नागरिकांनी अत्यंत ताठर भूमिका घेतली होती. तीन दिवस आंदोलकांनी कचराच टाकू दिला नाही. त्यामुळे कच-याचे ट्रक जकात नाक्यावर भरून ठेवण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरला नव्हता. कचºयाची कोंडी आणखी काही दिवस फुटली नसती तर मनपा प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली असती.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन तीन महिन्यांत कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नारेगाव डेपोवर कचरा टाकण्यास परवानगी देण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाने शहराच्या परिसरात कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळावी या करिता जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात तीसगाव, सावंगी, आडगाव (बु.), नक्षत्रवाडी, चिकलठाणा, सातारा-देवळाई या ठिकाणांचा समावेश करण्यात आला; परंतु या गावच्या नागरिकांनी कचरा डेपोला जागा देण्यास कडाडून विरोध करीत आंदोलन केले. त्यामुळे मनपाला कचरा टाकण्यासाठी जागाच उरलेली नाही.विहित नमुन्यात प्रस्तावजिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दिल्यानंतर प्रशासनाने विहीत नमुन्यात प्रस्ताव देण्याची सूचना मनपाला केली. मनपाने विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर केला. त्यानंतरही मनपाला जागा मिळालेली नाही. मनपाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे.
कचराप्रश्नी महापालिकेची चिंता वाढू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:12 AM