लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील गुंज येथील रहिवासी लष्करी जवान तब्बल ११ दिवसांपासून बेपत्ता आहे. या जवानाच्या शोधार्थ कुटुंबीय रेल्वे मार्गावरील स्टेशनवर फिरत आहेत. जवानाच्या चिंतेने गुंज ग्रामस्थ चिंतातुर असून, आजच्या महालक्ष्मीच्याही सणावरही या चिंतेचे सावट स्पष्ट दिसत आहे.भारतीय लष्करातील जवान बाळू कोंडिबा नरवाडे रा. गुंज ता. वसमत हे पंजाब राज्यातील फिरोजपूर युनिटमध्ये तैनात आहेत. सुट्टीसाठी ते गावाकडे आले होते. सुट्टी संपवून २० आॅगस्ट रोजी नांदेड रेल्वेस्थानकावरुन रेल्वेने ते फिरोजपूरकडे रवाना झाले. मात्र मुक्कामाला पोहोचले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ११ दिवस झाले तरीही बेपत्ता जवानाचा पत्ता लागलेला नाही. जवानाचा मोबाईल लोकेशनवरुन शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र जालना येथून २० आॅगस्ट रोजी १. ४६ मिनिटांनी त्यांनी मित्राला कॉल केल्याचे तेवढेच समोर आले. त्यानंतर पुढे त्यांचे मोबाईल लोकेशन लागत नाही. त्यामुळे चिंता वाढतच चालली आहे. जवानाचा घातपात झाला की, कोणी अपहरण केले का? अन्य काही अघटित घटना घडली, हे समजण्यास मार्गच नाही. पोलीस प्रशासनाने जवानाच्या मिसिंगची तक्रार तेवढी नोंदवून घेतली बस. खरे तर तपासाची चक्रे वेगाने फिरणे अपेक्षित होते. मात्र मोबाईल टॉवर लोकेशनच्या पुढे तपास जात नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थही आता या प्रकाराबाबत ओरड करीत आहेत. देशसेवेसाठी झटणाºया जवानाच्या तपासासाठी पोलीस दलाने काहीतरी करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नातेवाईक त्यांच्या शोधार्थ जिवाचे रान करीत आहेत.
बेपत्ता जवानामुळे गुंजकर चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:03 AM