शिक्षण : अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकाचे कसे होणार, हा प्रश्न अनुत्तरितच
औरंगाबाद : जिल्ह्यात दि. ११ मार्च ते दि.४ एप्रिलपर्यंत अंशतः लाॅकलाडऊन घोषित केल्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा आलेल्या असताना विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना आता अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक पूर्ण कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३ नोव्हेंबरला तर शहरात ४ जानेवारीपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.
ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक अडचणींमुळे ३० ते ४० टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकले. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या शंकांच्या समाधानावर भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मात्र, प्रत्यक्ष वर्ग बंद होणार असल्याने पुन्हा त्याच तांत्रिक अडचणी, परीक्षा दिवसागणिक जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतून परीक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
---
परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असल्याने मार्च आणि एप्रिलच्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी मिळाले होते. सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून हे प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. ते सुरू ठेवायला हवे होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद
---
जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणे झाले, त्यानुसार केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. शाळा, शिकवण्या, क्लासेस यांना प्रतिबंध आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्गही बंद राहतील. त्यामुळे दहावी, बारावीचा अभ्यासही ऑनलाइनच सुरू राहील.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग
--
दहावीचे विद्यार्थी ६५,०११
--
बारावीचे विद्यार्थी ५५,१७७
--