औरंगाबाद : दीड ते अडीच इंच आकाराचा पाठीवर शंख असलेल्या मोठ्या आकाराच्या शंखी गोगलगायी शहरालगतच्या शेतात आढळून येत आहेत. बहुभक्षी असलेली गोगलगाय रोपावस्थेतील पिकांची पाने खावून नुकसान करीत असतात. मात्र, सध्या आढळत असलेल्या मोठ्या गाेगलगायी तुरळक असून जास्त नुकसान करीत नसल्याचे कृषी कीटकतज्ञांनी सांगितले.
बनेवाडी शिवारात या गोगलगायी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यांच्या पाठीवरचे मोठे शंख अनेकांना आकर्षित करत आहेत. एरवी नखाएवढ्या असणाऱ्या या शंखी गोगलगायी अडीच ते दोन इंच शंख कवच पाठीवर घेऊन दिसत असल्याने कुतूहलाचा विषयही ठरत आहेत.
गेल्या ३५ वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोगलगायी शेतात दिसून येत आहेत. नखाएवढ्या लहान असताना त्या पिकांची पाने खातात. मात्र तुरळक ठिकाणी आढळून येणाऱ्या या गोगलगायींना काही त्रास नाही. लॉकडाऊनमुळे कमी झालेले प्रदुषण आणि शेतातील ये- जा कमी झाल्याने वाचलेल्या गोगलगायी मोठ्या झाल्या आहेत. याशिवाय अनेक रानभाज्या, न दिसणाऱ्या मोसमी वनस्पतीही यावेळी दिसत असल्याचे शेतकरी भरतसिंग राजपूत यांनी सांगितले.
शंखी गोगलगायी पुर्वी कोकणात, नंतर विदर्भात आणि आता आपल्याकडेही दिसत आहेत. पाऊस कमी झाल्यावर त्यांची संख्याही कमी होते. त्यांच्यापासून पिकांना धोका नसून जास्त प्रादुर्भाव दिसल्यास मेटा अल्डीआयच्या एकरी एक किलो गोळ्या पसरवल्या तर त्यांची संख्या नियंत्रणात येऊ शकते किंवा पांढरा चुन्याच्या पट्ट्या मारल्या तरी त्या शेतात येत नाहीत, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागप्रमुख एस. डी. बंटेवाड यांनी सांगितले.