औरंगाबाद : जुन्या शहरातील दोन ते तीन नगरसेवकांच्या वाॅर्डमधून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील दोन दशकांमध्ये राजकीय मंडळींनी एकाही रस्त्याचा विकास केला नाही. त्यामुळे रस्त्याचा वापर करणाऱ्या औरंगाबादकरांना सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यंदा महापालिकेत ''कारभारी'' नाहीत. प्रशासन तरी रस्त्यांची कामे करेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रशासनाने मागील दहा महिन्यांत एकाही रस्त्याचे काम केले नाही.
संस्थान गणपती ते नवाबपुरा
शहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये या रस्त्यावर महापालिकेने साधी डागडुजीसुद्धा केलेली नाही. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही कधी या रस्त्याची आठवण झाली नाही. दोन वेगवेगळ्या नगरसेवकांची हद्द या रस्त्याला मिळते. त्यामुळे नगरसेवकांनी वाॅर्डातील अंतर्गत रस्ते गुळगुळीत केले मुख्य रस्ता तसाच सोडून दिला.
नवाबपुरा चौक ते लक्ष्मण चावडी
जुना मोंढा भागातील रस्त्याचा व्यापाऱ्यांना जाम वैताग आला आहे. हरी मशीद ते नवाबपुरा या रस्त्यावर दिवसभरातून किमान ५० वेळेस वाहतूक कोंडी होते. या भागातील सर्व व्यापारी १०० टक्के महापालिकेला व्यावसायिक कर अदा करतात. त्या तुलनेत महापालिका व्यापाऱ्यांना कोणत्याही सोयी-सुविधा देत नाही. महापालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता १०० फूट रुंद आहे. या भागातील बहुतांश मालमताधारक रस्ता रुंदीकरणाला तयार आहेत. मात्र, महापालिकाच पुढाकार घ्यायला तयार नाही, असा आरोप या भागातील व्यापाऱ्यांनी केला. अरुंद, खराब रस्त्यामुळे ग्राहक अनेक दुकानांमध्ये येण्यास तयार नाहीत.
अंगूरीबाग ते गुलमंडी
अंगूरीबाग ते गुलमंडी हा रस्ता तीन वेगवेगळ्या नगरसेवकांच्या हद्दीत येतो. मागील दहा वर्षांमध्ये संबंधित नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांमध्ये कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते तयार केले. मात्र, दिवान देवडी अंगूरीबागकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्यावर चारचाकी चालविणे अशक्यप्राय आहे. दोन आठवड्यांपूर्वी या भागातील खड्डयामध्ये चारचाकी वाहन फसले होते. दुचाकीवाहनधारकांना त्यापेक्षाही जास्त कसरत करावी लागते. आता या रस्त्यावर ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे. मनपा प्रशासन स्वतःहून तरी हा रस्ता गुळगुळीत करून देईल अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापाऱ्यांना आहे.
जिन्सी चौक ते दमडी महल
जिल्हाधिकारी कार्यालयापासून दमडी महाल ते जिन्सी चौकापर्यंत १०० फूट रुंद रस्ता आहे. हजरत निजामुद्दीन औलिया दर्गा समोरील रोड अत्यंत अरुंद आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून झालेले नाही ते विशेष. रस्त्याचे काम न होण्यामागे कारण एकच आहे. वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या वाॅर्डमधील हा प्रमुख रस्ता आहे.