या खून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत रमेश गुंजकर याने भोकर तालुक्यात प्रवेश करू नये. त्याने त्याचा सध्याचा पत्ता आणि मोबाइल नंबर पोलिसांना द्यावा या अटीवर ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर खंडपीठाने रमेशला जामीन मंजूर केला आहे.
मौजे बल्लाळ येथील सालगडी मारुती गंगाधर गाडेकर यांचा ६ जुलै २०२० रोजी अज्ञात व्यक्तींनी रुमालाने गळा आवळून खून केला असल्याची फिर्याद शेतकरी मोहन रामराव श्रीखंडे यांनी दिली होती. याबाबत उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी म्हणून गोविंद भीमराव जाधव, आशाबाई मारुती गाडेकर आणि रमेश बापूराव गुंजकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. भोकर येथील सत्र न्यायालयाने १ डिसेंबर २०२० रोजी आरोपींचा जामीन नाकारला होता. सदर आदेशाच्या नाराजीने आरोपी रमेश गुंजकर याने ॲड. संतोष छत्रपती भोसले यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी अंति खंडपीठाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.