औरंगाबाद : भारतीय परिचर्या परिषदेच्या निवेदनानुसार राज्यातील बी.एस्सी. नर्सिंगच्या उर्वरित ५,१६४ जागांसाठी बारावीच्या गुणांआधारेच नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी (दि. २४) राज्य शासनास दिले. राज्य शासनाने ऑनलाइन नोंदणीसाठी ५ दिवसांचा अवधी देऊन प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, असेही आदेशात म्हटले आहे.
त्यामुळे ‘नीट यूजी’मध्ये ५० पर्सेंटाईलपेक्षा कमी गुणांकन असलेल्या विद्यार्थ्यांनाही १२वीच्या गुणांनुसार या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल. रितू गायकवाड व प्रतीक्षा पाटील या दोन विद्यार्थिनींनी ॲड. प्रल्हाद बचाटे यांच्यामार्फत व प्रायव्हेट नर्सिंग स्कूल्स अँड काॅलेज मॅनेजमेंट असोसिएशन व असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग काॅलेजकडून डाॅ. बाळासाहेब पवार, डाॅ. धनंजय कुलकर्णी यांनी ज्येष्ठ विधिज्ञ विनायक होन व ॲड. अश्विन होन यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या होत्या.
भारतीय परिचर्या परिषदेच्या १५ जुलै २०२१ च्या अद्यादेशानुसार बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रवेशासाठी १२वीमध्ये ‘पीसीबी’ गटात इंग्रजी विषयासह ४५ टक्के गुण आवश्यक होते किंवा राज्य सरकार अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ‘पीसीबी’, इंग्रजी व ‘ॲप्टिट्यूड’ या ५ विषयांची प्रत्येकी २० गुणांची अशी १०० गुणांची परीक्षा घ्यावी. या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणारे प्रवेशासाठी पात्र होते.
असे असताना परिचर्या परिषदेने ८ एप्रिल २०२२ रोजी आणखी एक अद्यादेश जारी केला. सर्वसामान्य (जनरल) गटातील विद्यार्थ्यांना ‘५० पर्सेंटाइल’ आणि एससी, एसटी, ओबीसी गटातील विद्यार्थ्यांना ‘४० पर्सेंटाइल’ गुणांकन असेल तरच बी.एस्सी. नर्सिंगला प्रवेश मिळेल, असे त्यात म्हटले होते. त्याआधारे सीईटी सेलने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘नीट-यूजी’ परीक्षेचे माहिती पत्रक (ब्राउशर) प्रसिद्ध करून बीएस्सी नर्सिंग प्रवेशासाठी वरीलप्रमाणे पात्रता घोषित केली. याचिकाकर्त्यांनी वरील माहिती पत्रक आणि ८ एप्रिलच्या अध्यादेशाला आव्हान दिले होते. ‘पर्सेंटाइल’ची अट लागू करू नये. १२ वीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश द्यावेत, अशी विनंती केली होती.
खंडपीठाने काल (बुधवारी) केलेल्या विचारणेनुसार ॲड. दीपक मनूरकर यांनी आजच्या सुनावणीदरम्यान भारतीय परिचर्या परिषदेचा १६ जून २०२२ चा अद्यादेश आणि २३ नोव्हेंबर २०२२ चे शुद्धिपत्रक दाखल करून बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रवेशासाठी १२वीमध्ये ‘पीसीबी’ गटात इंग्रजी विषयासह ४५ टक्के गुण किंवा राज्य सरकार अथवा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या १०० गुणांच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणारे प्रवेशासाठी पात्र आहेत, असे निवेदन केले.
उर्वरित ५,१६४ जागांसाठी नवी प्रवेश प्रक्रियाराज्यातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ६,४०० जागांपैकी पहिल्या फेरीत ‘नीट-यूजी’नुसार १,२३६ विद्यार्थांचे प्रवेश झाले आहेत. आता उर्वरित ५,१६४ जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.