औरंगाबाद : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या पथकास रेल्वेस्टेशन रोडवरील मिठाई दुकानाच्या मालकांनी शिवीगाळ करीत जिवे करण्याची धमकी दिली. या प्रकरणात मालक डुंगरसिंग हिरालाल राजपुरोहित व त्यांचा भाऊ राजूसिंग हिरालाल राजपुरोहित यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहायक अभियंता सुनील सातदिवे यांच्या फिर्यादीनुसार, रेल्वेस्टेशन रोडवरील सिद्धार्थ आर्केड इमारतीमध्ये तळमजल्यावर मिठाईचे दुकान आहे. या दुकानात सच्चाई फुड्स प्रॉडक्ट नावाने डुंगरसिंग राजपुरोहित यांचे वीज मीटर आहे. त्याचा ग्राहक क्रमांक ४९००१४६४९३५० असा आहे. या ग्राहकाकडे ८५ हजार ९२४ रुपये थकबाकी असून, चालू बिल १६ हजार ७२४ रुपये असे एकूण १ लाख २ हजार ८६० रुपये वीज बिल आहे.
१७ ऑगस्ट रोजी त्यांनी एमएसईबीच्या नावाने ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, खात्यावर पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही. याबाबत राजपुरोहित यांच्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी ११ सप्टेंबर रोजी नव्याने धनादेश देतो, असे कळविले. यानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाने, वरिष्ठ तंत्रज्ञ अर्जुन वैद्य आणि सहायक अभियंता सुनील सातदिवे हे मधुर मिलन मिठाई दुकानात शनिवारी पोहोचले. त्याठिकाणी डुंगरसिंग राजपुरोहित यांच्याकडे थकीत बिलाची मागणी करण्यात आली. तेव्हा डुंगरसिंग यांनी बाउन्स झालेल्या ५० हजार रुपयांच्या धनादेशाची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावरून अधिकारी आणि राजपुरोहित यांच्या वादग्रस्त चर्चा झाली. तेव्हा डुंगरसिंग यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचा भाऊ राजूसिंग याने थेट अधिकाऱ्याची गचांडीच पकडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात निरीक्षक सचिन सानप यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.