औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी ऑडिओ (ध्वनीफित) संदेश व्हीव्हीआयपी व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. मात्र, प्रशासनातील सुप्रीम ग्रुपमधील हा संदेश काही तासातच सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यामुळे गोपनीयतेची ‘ऐसी की तैसी’ झाली. या सगळ्या प्रकाराबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे प्रशासनातील त्या व्हीआयपी ‘ग्रुप’वर सन्नाटा पसरला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विभागीय आयुक्तांसह विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोना संसर्गवाढीबाबतच्या उपाययोजना आणि सूचनांवर चर्चा केली. यानंतर आयुक्तांनी विभागातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्याऐवजी एक ध्वनीफित तयार करून ती ‘त्या’ व्हीआयपी ग्रुपवर टाकली. या ग्रुपमध्ये आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, आयुक्तांसह काही अपर जिल्हाधिकारी आणि विभागीय उपायुक्तांचा समावेश आहे. आयुक्तांनी मंगळवारी रात्री उशिरा ही ध्वनीफित व्हीआयपी ग्रुपमध्ये अपलोड केल्यानंतर १२ वाजून १० मिनिटांनी शहरातील एका ग्रुपमध्ये ती ध्वनीफित आढळली. त्यानंतर एकाला ती क्लीप वैजापूर ग्रामीणमधून तर एकाला बीडमधून आली. आयुक्तांना या क्लीपबाबत रात्री काहींनी विचारणादेखील केली. गोपनीय ग्रुपवर टाकलेली क्लीप बाहेर सामान्यांपर्यंत आलीच कशी, यावरून आयुक्त संतापले व त्यांनी ‘त्या’ ग्रुपवर खरपूस समाचार घेणारा संदेश टाकल्यानंतर बुधवारी दिवसभर ग्रुपवर सन्नाटा होता. या सगळ्या प्रकरणाबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर बोलणे टाळले.
केला खोडसाळपणा; पण झाले भलतेचआयुक्तांनी त्या क्लीपमध्ये हिंगोली, परभणी, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्यांनी अतिशय चिडून या सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी विभागातील सनदी अधिकाऱ्यांना आजवर विनम्र भाषेत कधीच सूचना केलेल्या नाहीत, तो त्यांचा स्वभावही नाही. त्यामुळे त्यांची ही प्रतिमा जगासमोर आणण्यासाठीच त्या ग्रुपमधील काहींनी खोडसाळपणाने ती क्लीप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केली. परंतु, त्याचा परिणाम उलटा झाला असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुणीतरी त्यांची जबाबदारी समजावून सांगत असल्याने जनसामान्यांमध्ये आयुक्तांची प्रतिमा आणखी उंचावल्याचे म्हटले जात आहे.