औरंगाबाद : शहरातील नवबौद्ध घटकासाठी नळ जोडणी व वैयक्तिक स्वच्छतागृह योजना शासन अनुदानातून महापालिकेतर्फे राबविण्यात आली आहे. या योजनेत ३ कोटी ३४ लाख ३ हजार ९८६ रुपये खर्च करण्यात आले. महापालिकेने मात्र लाभार्थी व खर्चाचे वेगवेगळे आकडे शासनाला कळविले आहेत. त्यामुळे यासंदर्भात त्वरित खुलासा करावा, असे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महापालिकेला पाठविले आहे.
राज्य शासनाने नवबौद्धांसाठी मोफत नळ जोडणी व स्वच्छतागृह योजना काही वर्षांपूर्वी राबविली होती. त्यासाठी महापालिकेमार्फत लाभार्थींची निवड करण्यात आली. महापालिकेने भीमनगर, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनीसह अन्य भागात नळ कनेक्शन दिले. त्यासाठी ३ कोटी ३४ लाख ३ हजार ९८६ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, अन्य एका पत्रात दोन कोटी ६८ लाख ९५ हजार ८६४ रुपये खर्च दाखविण्यात आला. कोणता आकडा खरा याविषयी खुलासा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महापालिकेला केल्या आहेत.
---------
लाभार्थींच्या आकड्यातही तफावत
खर्चाच्या आकड्यासोबत लाभार्थींच्या आकड्यातही तफावत आहे. एका पत्रात ९ हजार २३० जणांना लाभ देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर दुसऱ्या पत्रात लाभार्थींची संख्या ५ हजार २३० एवढी दाखविण्यात आली आहे. या मुद्द्यावर देखील खुलासा करण्यात यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
----------
पाईपलाईनची केली कामे
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अन्य एका पत्रात भीमनगर, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनीत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामावर आक्षेप घेतला आहे. या योजनेत नळ जोडण्या देणे अपेक्षित होते. पाईपलाईनची कामे अन्य निधीतून किंवा नगर विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून करणे गरजेचे होते, असे पत्र कक्ष अधिकाऱ्याने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे महापालिका संकटात सापडण्याची शक्यता आहे.