औरंगाबाद : शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सुरू राहतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने देऊन ७२ तास उलटत नाही, तोच राज्याच्या मुख्य सचिवांनी मंगळवारी नवीन आदेश काढून, सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहतील, असे सांगितले. यामुळे नेमके किती वाजता दुकाने बंद करायची, हाच संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाला. लेखी आदेश नसल्याने मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व किराणा, मिठाई, बेकरी दुकाने उघडी होती; पण कारवाईच्या भीतीने ग्राहकांनी ११ वाजताच बाजारपेठेतून काढता पाय घेतला.
मुख्यमंत्री आता बुधवारी निर्णय जाहीर करणार आहेत. मग ते संपूर्ण लॉकडाऊन लावतात की सकाळी ४ तास दुकाने उघडण्यास परवानगी देतात, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शासन आदेशात ''कन्फ्युजन ही कन्फ्युजन है'' यामुळे शहरवासीच नव्हे तर पोलीस विभागही गोंधळात आहे. शहरात काही भागात पोलिसांनी सकाळी ११ वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते; पण लेखी आदेश नसल्याने त्यांनाही गुपचूप बसावे लागले.
चौकट
आज ४ तास दुकाने राहतील उघडे
जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवा, अशी भूमिका जिल्हा व्यापारी महासंघाने घेतली होती; मात्र मुख्य सचिवांनी नवीन आदेश काढल्याने बुधवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने उघडी राहतील. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्यावर गुरुवारी किती वाजता दुकाने सुरू व बंद करायचे, ते स्पष्ट होईल.
चौकट
व्यापाऱ्यांच्या लसीकरणाचे काय?
मनपा व जिल्हा व्यापारी महासंघ यांनी व्यापाऱ्यांसाठी शहरातील ११ ठिकाणी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. लस संपल्याने मंगळवारी दुपारी मोहीम बंद करावी लागली. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना १ मेनंतर दुकाने उघडू दिली जाणार नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर संचारबंदी सुरू होईल, तेव्हा व्यापाऱ्यांना लसीकरणासाठी केंद्रावर जाऊ दिले जाईल का, असा प्रश्न मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी उपस्थित केला.