औरंगाबाद : ‘स्त्री-पुरुष तुलना, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?’ या प्रश्नाचे पर्याय पाहून विद्यार्थ्यांना डोक्यालाच हात लावावा लागला. पर्याय होते सीता, गीता, नीता आणि सविता. बी. ए. प्रथम वर्षाच्या परीक्षेत मराठीच्या पेपरमधील या प्रश्नाचे पर्याय पाहून विद्यार्थ्यांबरोबर साहित्यिकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रश्नाचे पर्याय बदलून देण्यात आले. त्यामुळे कोणाचीही अडचण झाली नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. ए. आणि बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या परीक्षांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. मुलांच्या हाॅल तिकिटावर मुलींचे छायाचित्र येण्याचा प्रकार एका दिवसापूर्वी समोर आला होता. परंतु, त्यानंतरही परीक्षेत या ना त्या कारणाने गोंधळ सुरूच आहे. ‘स्त्री-पुरुष तुलना, या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?’ हा प्रश्न आणि त्यासाठी दिलेले अजब पर्याय असलेला पेपर गुरुवारी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. हा पेपर बुधवारी झाल्याचे एका विद्यार्थ्याच्या पालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळासंदर्भात अधिसभेच्या पदवीधर सदस्यांनी गुरुवारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन हॉल तिकीट न मिळाल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेची संधी देण्यात यावी, परीक्षा प्रक्रियेकडे विशेष लक्ष देऊन पुढील परीक्षा सुरळीत घेण्यासाठी सूचना द्याव्यात, असे निवेदन दिले. यावेळी पदवीधर अधिसभा सदस्य डॉ. भारत खैरनार, दत्तात्रय भांगे, हरिदास सोमवंशी, डॉ. दीपक बहीर, निखिल सहस्रबुद्धे, राकेश खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरूंनी कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही, परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेची संधी दिली जाईल, हॉल तिकीट न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पीआरएन नंबरवरती परीक्षेस बसू देण्याची परवानगी परीक्षा केंद्रांना दिली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
हाॅलतिकीट १० दिवसांपूर्वी मिळावेयापुढे होणाऱ्या परीक्षेचे अर्ज परीक्षेपूर्वी किमान १५ दिवस आधी भरून घेण्यात आले पाहिजे. हाॅलतिकीट परीक्षेच्या १० दिवसांपूर्वी वाटप करण्यात यावे. रिड्रेसलचा निकाल त्वरित लावावा.- दत्तात्रय भांगे