औरंगाबाद : राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा गोंधळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे. परीक्षेच्या तारखांमध्ये तीनवेळा बदल झाल्यानंतर आता २१ नोव्हेंबरला टीईटी (TET Exam ) होणार आहे; परंतु यादिवशी सुद्धा ‘नेट’ परीक्षा (Net Exam ) आल्याने टीईटीमध्ये पुन्हा बदल होतो की काय, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. (UGC-NET and TET exams are on the same day)
दाेन वर्षांनंतर शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आतापर्यंत तीनवेळा ही परीक्षा वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलण्यात आली. आराेग्य विभागाच्या परीक्षा ३१ ऑक्टाेबरला हाेणार असल्याने ही परीक्षा ३० ऑक्टाेबरला हाेणार हाेती. मात्र, विधानसभेच्या पाेटनिवडणुकीमुळे ही परीक्षा २१ नाेव्हेंबरला नियाेजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहेत. मात्र, याच दिवशी प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी नेट परीक्षाही हाेणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दाेनपैकी एकच परीक्षा देता येणार आहे. टीईटी आणि नेट दाेन्ही परीक्षांचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहेत.
२० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत नेटएनटीए या एजेन्सीद्वारे युजीसी-नेट ही केंद्रीय परीक्षा घेण्यात येते. जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षांच्या तारखा याचा दरम्यान होणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकच असल्याने पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा नोव्हेंबर २० ते डिसेंबर ५ या दरम्यान होणार आहे. नेट परीक्षा संगणकावर घेण्यात येत असून प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहेत.