औरंगाबाद : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा सुरू होताच सदस्यांनी ऑनलाइन सभेला विरोध करत सभागृहात ऑफलाईन सभा घेण्याची मागणी केली. तर अध्यक्ष मीना शेळके यांनी मांडलेले प्रस्ताव चर्चेला घेऊन १५ दिवसात पुन्हा सर्वसाधारण सभा घेऊ असे स्पष्ट केल्यावर कामकाज सुरू झाले.
ऑनलाइन सभा घेऊ नका. पालकमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री यांनी दीडशे दोनशे लोकांच्या बैठका घेतल्या. सर्वांचे दौरे सुरू आहेत. मग एका ऑनलाइन सभे संदर्भातील परिपत्रकच्या आडून जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. असे म्हणत ४० सदस्यांचे सभा रद्द करा अशा मागणीचे पत्र उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांनी अध्यक्ष मीना शेळके यांना दिले.
सोशल डिस्टन्स ठेऊन सभा घेऊ पण आजची सभा चालू होऊ द्या. पुन्हा आठवडाभरात सर्वसाधारण सभा घेऊ असे अर्थ समिती किशोर बलांडे यांनी स्पष्ट केले. तर एकाच परिपत्रकाचे पालन शंभर टक्के का. मग प्रशासन शासनाचे सर्व आदेशांचे पालन का करत नाही. असा सवाल उपस्थित करत प्रत्यक्ष सभागृहात सभा घ्या, अशी मागणी मधुकर वालतुरे यांनी केली. तर केशवराव तायडे यांनी सभेचे कामकाज पूर्ण करून तहकूब करून सभा घेण्याची मागणी केली. तर ऑनलाइन उपस्थित सदस्यांची सभा तहकूब करण्याची मागणी केली. सदस्यांच्या अधिकारावर गदा आणू नका. लवकरच आचारसंहिता लागेल. त्यामुळे सदस्यांची भावना लक्षात घ्या. असे गायकवाड म्हणाले.
सीईओच्या कामकाजावर सदस्य नाराज आहेत. सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा तहकूब करा असे सदस्य रमेश गायकवाड म्हणाले. बांधकाम विभागातील अनियमित पदभार देण्यावरून सदस्य विजय चव्हाण यांनी प्रश्न मार्गी लागत नसल्याचा निषेध व्यक्त केला. पाच महिन्यापूर्वीचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर येत नाही याबद्दल किशोर पवार यांनी नाराजी व्यक्त केली.