औरंगाबाद : एका महिलेच्या मृत्यूवरून सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री डॉक्टरांना धक्काबुक्की, तर कर्मचाऱ्यांना काही जणांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. रात्री १० वाजेपासून उशिरापर्यंत रुग्णालयात गोंधळ सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
रुग्णालय प्रशासनातर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती देण्यात आली. रुग्णालयाचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. उदय फुटे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. गुप्ता यांनी सांगितले, मंगळवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास एका ३२ वर्षीय महिलेला एका व्यक्तीने रिक्षातून उपचारासाठी अपघात विभागात दाखल केले. या व्यक्तीने स्वत:ला त्या महिलेचा पती असल्याचे डॉक्टरांना सांगितले. रुग्णाची तपासणी केली असता ती मृत पावलेली असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती देण्यासाठी त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला; परंतु ती व्यक्ती आणि रिक्षा रुग्णालयातून गायब झाल्याचे समोर आले.
मृत महिलेच्या पर्समध्ये असलेल्या क्रमाकांवरून नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर जवळपास १०० जणांचा जमाव रुग्णालयात जमा झाला. यात काहींनी महिलेला दाखल करणाऱ्या व्यक्तीला का जाऊ दिले, रुग्णाची कशाप्रकारे तपासणी केली यावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अपघात विभागातील डॉ. लोकेश मंत्री यांना धक्काबुक्की करण्यात आली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण दाखविण्याची मागणी करीत रुग्णवाहिका चालक शंकर उचित यांना मारहाण केली. यात उचित यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. सुपरवायझर हनुमंत कोलभुरे, ब्रदर उदय सोनवणे, सुरक्षारक्षक अंबादास पठाडे, शेख ताजू, सुनील जाधव यांनाही मारहाण करण्यात आली. रुग्णालयातील दूरध्वनी, संगणकाची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
फौजदारी गुन्हा नोंदवावाया घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पाहिल्यानंतर रात्री १.३० वाजेनंतर जमाव निघून गेला; परंतु त्यानंतर मृत महिलेचे कोणीही नातेवाईक आले नाही. बुधवारी दुपारी १ वाजता मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. कोणतीही चुकी नसताना होणाऱ्या अशा घटनांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होतो. याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी केल्याचे डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितले.
गुन्हा दाखलमहिलेच्या मृत्यूवरून धूत हॉस्पिटल येथे तोडफोड करून गोंधळ घालणाऱ्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली अरुण सोनवणे (३५, रा. सेलगाव, ता. बदनापूर) या गंभीर जखमी महिलेला धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचारावरून गोंधळ घालत १० ते १५ जणांनी तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे फुटेज पाहून या गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीला अटक करण्यात येईल. एमआयडीसी पोलीस ठाण्यात वैशाली सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे, तर गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.