औरंगाबाद - जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सभेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी गोंधळ घातला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच चालू अर्थसंकल्पामध्ये मराठा समाजासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा जाब मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच विचारला. त्यामुळे, उपस्थित आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.
महाआघाडी सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने निवेदनातून दिला. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. सरकारने केवळ आश्वासन दिलं आहे, पण ठोस उपाय झालेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातील औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी जयंत पाटील औरंगाबादला आले होते. त्यावेळी, या मेळाव्यात सहभागी होऊन आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच, जयंत पाटील यांना निवेदनही देण्यात आले.