छत्रपती संभाजीनगर : महायुतीमधील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर असली तरी मराठवाड्यातील पाच जागांबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे.
कन्नड मतदारसंघात विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत उद्धवसेनेकडे आहेत. २०१९ मध्ये अपक्ष हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे या मतदारसंघात पराभूत झाले होते. यामुळे महायुतीमध्ये भाजपची या जागेची वर्षभरापासून मागणी आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने आता शिंदेसेनेचा नैसर्गिक दावा असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार गटाने मात्र ठामपणे या जागेवर दावा केला नाही. भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या शिंदेसेनेत जाऊन तिकीट मिळवू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात २०१९ला शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे विजयी झाले होते. तिथे वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नारंगळे दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंगडे तिसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धोंगडे चौथ्या क्रमांकावर होते. सद्य:स्थितीत लोहा मतदारसंघ हा माजी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्यासाठी भाजपला हवा आहे. दुसरीकडे चिखलीकर यांच्या भगिनी आशाताई शिंदे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. श्यामसुंदर शिंदे हे चिखलीकरांचे मेहुणे आहेत. त्यामुळे याठिकाणी राजकीय आणि कौटुंबिक पेच दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता. आता हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. त्या बदल्यात गेवराई मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडण्याची भाजपची तयारी असल्याचे दिसते. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार यांनी २०१९मध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांचा पराभव केला होता. लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडल्यात जमा असल्याने या मतदारसंघात महायुतीपुढे पेच निर्माण झाला आहे.
उस्मानाबादमध्ये शिंदेसेना, राष्ट्रवादी आग्रहीउस्मानाबाद मतदारसंघात २०१९ साली शिवसेनेचे कैलास पाटील विजयी झाले. ते सध्या उद्धवसेनेबरोबर आहेत. या मतदारसंघात महायुतीतील शिंदेसेना, राष्ट्रवादी आणि भाजपनेही दावा केला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राष्ट्रवादीकडून शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुरेश पाटील तर शिंदेसेनेकडून सुधीर पाटील आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे धनंजय सावंत प्रबळ दावेदार आहेत. शिवाजी कापसे, सूरज सोळंके यांचीही नावे शिंदेसेनेकडून चर्चेत आहेत. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह यांनी भाजपला हा मतदारसंघ सुटल्यास उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन पक्षाला दिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपचा आवाज थोडा क्षीण झाला आहे.