औरंगाबाद : कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि बाजारपेठेत फळ, भाजीपाला व किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यात प्रशासनाला सतत अपयश येत आहे. मुळात प्रशासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून सकाळी एक, रात्री उशिरा एक, असे वेगवेगळे आदेश काढण्यात येत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. त्यात निर्णय घेणा-या व अंमलबजावणी करणा-या यंत्रणेत ताळमेळ नसल्याने, गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. यामुळे परिस्थिती बघून प्रशासनाला निर्णय घ्यावे लागत आहे; पण निर्णय घेताना विभागीय आयुक्त एक आदेश काढत आहेत, जिल्हाधिकारी दुसरा आदेश काढत आहेत, तिसरा आदेश पोलीस आयुक्त काढत आहे, तर चौथा आदेश मनपा आयुक्त काढत आहेत. यामुळे उद्या दुकाने सुरू राहणार की बंद राहणार याविषयी संभ्रम निर्माण होत आहे. व्यापारी प्रतिनिधींनी आरोप केला की, मुळात प्रशासनात एकवाक्यता नसल्याने संभ्रम आणखी वाढत आहे. प्रशासनाने जर भाजीपाला, फळ विक्री व किराणा विक्रीला दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी दिली असती, तर बाजारपेठेत गर्दी झालीच नसती. प्रशासन रात्री उशिरा आदेश काढून उद्यापासून किराणा, भाजीपाला विक्री बंद करते. यामुळे फळ व भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
मागील ६ दिवसांपासून फळ, भाजीपाला अडत बाजार, भाजीमंडई बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे, तर काहीच नियोजन नसल्याने व मैदानावर तात्पुरता भरविण्यात येणारा भाजी बाजारही स्थानिकांच्या विरोधामुळे बंद पडल्याने गुरुवारी बाजार उघडल्यावर सर्व गर्दी जाधववाडीत होईल, अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी व्यक्त केली, तर किराणा होलसेल व किरकोळ दुकानाचा वेळ दुपारपर्यंत ठेवल्याने खरेदीसाठी एकच गर्दी जुन्या मोंढ्यात उसळणार आहे. सलग बाजारपेठ सुरू ठेवून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विक्रीला परवानगी दिली, तर ग्राहकांमध्ये किराणा न मिळण्याची भीती कमी होईल व बाजारातील गर्दी कमी होईल. मात्र, प्रशासन व्यापारी संघटनांना विचारात न घेताच आदेश काढत असल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचेही व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले.
प्रशासन चर्चा करीत नाहीशेतक-यांचे हित लक्षात घेता बाजार समितीमधील सर्व अडत व्यवहार सुरू ठेवा, असा आदेश पण संचालकांनी काढला आहे, तर स्थानिक प्रशासन कधी वेळेचे बंधन घालते, तर कधी अचानक व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काढते. आदेश देण्यापूर्वी बाजार समिती सभापती, संचालकांशी चर्चा केली जात नसल्याने सर्व गोंधळ उडतो. किरकोळ भाजीपाला विक्रीची मंडई भरविण्याची जबाबदारी मनपाची आहे; त्यांचे शहरात ४१ ठिकाणी मंडई भरविण्याचे नियोजन बारगळले, त्यामुळे जाधववाडीत गर्दी उसळत आहे. -राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
प्रशासनात ताळमेळाचा अभावप्रशासनात ताळमेळाचा अभाव असल्याने बाजारपेठेसंदर्भातील कोणताही निर्णय यशस्वी होत नाही. किराणा दुकान सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत उघडी ठेवली, तर ग्राहकांमधील बंदची भीती कमी होऊन ते धान्यसाठा करणार नाहीत. यासाठी बाजारपेठेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी व्यापारी संघटनेशी प्रशासनाने चर्चा करावी. -लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ
नुकसान कोण भरून देणार?रमजान महिन्यामुळे व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात फळे मागविली आहेत. मात्र, प्रशासनाने पूर्वसूचना न देता, अचानक रात्री निर्णय घेत फळ, भाजीपाला विक्री बंद केली. मागील ५ दिवसांत फळे, भाजीपाला खराब होऊन ५० लाखांचे नुकसान झाले. हे नुकसान कोण भरून देणार. ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, त्यांनी दुप्पट भावात विकून ग्राहकांना लुटले. - इसा खान, अध्यक्ष, फळ, भाजीपाला अडत असोसिएशन