औरंगाबाद : प्राध्यापक व वसतिगृहात राहणाऱ्या एका संशोधक विद्यार्थिनीने ‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्याचा रचलेला बेत विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांनी काल रात्री उधळून लावला. वसतिगृहाबाहेर जाण्यासाठी रात्री साडेदहा- अकरा वाजेपर्यंत ‘त्या’ प्राध्यापक व विद्यार्थिनीने गोंधळ घातला. शेवटी हे प्रकरण पोलिसांत जाण्याची चिन्हे दिसताच प्राध्यापक महाशयाने तेथून काढता पाय घेतला.झाले असे की, विद्यापीठातील एका विभागात एक प्राध्यापक महाशय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करीत आहेत. एक विद्यार्थिनी त्या प्राध्यापकाकडे एम. फिल. करते. ती सध्या विद्यापीठ कॅम्पसमधील एका वसतिगृहात राहात आहे. मागील काही महिन्यांपासून या ‘गुरू- शिष्या’ने पुढचे पाऊल उचलले असल्याची खमंग चर्चा विभागातील संपूर्ण शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आहे. काल रात्री वसतिगृहाबाहेर जाण्यासाठी सदरील विद्यार्थिनीने वॉर्डनकडे आग्रह धरला; पण विद्यापीठ नियमानुसार सायंकाळनंतर वसतिगृहाबाहेर जाण्यास विद्यार्थिनींना मुभा नाही. त्यामुळे वॉर्डन, सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थिनीला वसतिगृहाबाहेर सोडलेच नाही.शेवटी त्या विद्यार्थिनीने मोठमोठ्याने रडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्याने विद्यार्थी कल्याण संचालकांना बोलावून घेतले. रात्री १० वाजेच्या सुमारास विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक वसतिगृहात पोहोचल्या व त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. तेव्हा त्या विद्यार्थिनीने सांगितले की, मला माझ्या ‘भावजी’कडे जायचे आहे. तिने आपल्या ‘भावजी’ला बोलावून घेतले. त्या व्यक्तीने मला या विद्यार्थिनीला घरी घेऊन जायचेच नाही, असे स्पष्ट करीत तो निघून गेला.यानंतर काही क्षणात ते प्राध्यापक महाशय तेथे अवतरले. ते म्हणाले की, मी हिला घेऊन जातो. त्यावर संचालकांनी प्रश्न केला की, तुमचा काय संबंध. तुम्ही एका विद्यार्थिनीला घरी घेऊन जायचे कसे म्हणता. त्यानंतर ते प्राध्यापक महाशय व संचालकांमध्ये बराच वेळ हुज्जत झाली. त्यानंतर संचालकांनी कुलगुरूंना रात्रीच मोबाईलवरून वसतिगृहात सुरू असलेला हा प्रकार सांगितला. तेव्हा कुलगुरूंनी त्या प्राध्यापकाविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. कुलगुरूंच्या कानावर ही गोष्ट गेल्याचे समजताच ते महाशय तेथून निघून गेले. संचालकांनी प्राध्यापकाच्या वर्तनाविरुद्ध आज कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या कार्यालयात तसेच विद्यापीठातील ‘विशाखा’ समितीकडे लेखी तक्रार दिली.
विद्यार्थिनीसोबत ‘थर्टीफर्स्ट’ चा गोंधळ
By admin | Published: January 02, 2015 12:26 AM