सोयगाव : सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर ज्येष्ठांचे लसीकरण सोमवारी पूर्ववत करण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने लसीकरणासाठी नागरिकांना चार तास ताटकळत बसावे लागले. अखेर नागरिकांना लस न घेताच गावी परतावे लागले. हा प्रकार जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे.
कोविडसाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी हजर न झाल्याने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांना मनस्ताप सहन करावा लागला. जरंडी आरोग्य केंद्रात गुरुवारपासून ज्येष्ठांना कोविड लसीकरण करावे लागले. दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे सोमवारी पुन्हा लसीकरण हाती घेण्यात येणार होते, परंतु संबंधित कोविडसाठी नियुक्त करण्यात आलेला वैद्यकीय अधिकारीच न आल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळात तरी या केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.